रत्नागिरी : चौपदरीकरणाने खुलले भोस्ते घाटाचे रुपडे! | पुढारी

रत्नागिरी : चौपदरीकरणाने खुलले भोस्ते घाटाचे रुपडे!

खेड; अनुज जोशी :  मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली आहे. त्या सोबतच घाटाच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे. घाटातील एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण वगळता संपूर्ण घाट सुरक्षित आहे. अवजड वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी व महामार्ग बांधकाम विभागाने योग्य खबरदारी घेतल्यास डोकेदुखी ठरणार वळण देखील सुखदायी बनेल.

गोव्यातून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे एका वळणावर अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र, या वळणाच्या ठिकाणावरून दिसणारे खेड शहर व जगबुडी नदीचे विहंगम दृश्य पाहण्याचा मोह महामार्गावरून ये जा करणार्‍यांना नक्की होतो. चौपदरीकरण काम झाल्यावर घाटातील बहुतेक तीव्र व नागमोडी वळणे काढण्यात आली आहेत. मात्र, घाटाच्या शेवटच्या टप्प्यात असलेले तीव्र उतार व यू इंग्रजी आकाराचे हे वळण या मार्गावरून नियमित मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांनासुद्धा चुकवता येत नसल्याने धोकादायक ठरले आहे. भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या घाटात काही ठिकाणी दरड कापण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा वाहतूक करणारी लेन सुरक्षित झाल्याचे दिसून येते. मात्र, भोस्ते घाटातील धोकादायक आणि तीव्र उतार असलेले हे यु आकाराचे वळण अजूनही अपघातग्रस्त ठिकाण बनले आहे.

या वळणावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी सुमारे 100 मीटर अंतरावर तब्बल दहा मोठे मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यात या घाटातून प्रवास करने ही एक पर्वणी आहे. हिरव्या रंगाची शाल पांघरलेला डोंगर माथा व पावसाच्या कोसळणार्‍या सरी यातून होणारा प्रवास कोकण मार्गे मार्गक्रमण करणार्‍या प्रवाशांना सुखावत आहे.

Back to top button