सावर्डेसह चिपळूण पाग येथे उड्डाण पुलाच्या प्रस्तावाला राज्याची मंजुरी | पुढारी

सावर्डेसह चिपळूण पाग येथे उड्डाण पुलाच्या प्रस्तावाला राज्याची मंजुरी

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : अनेकवेळा राज्यापासून केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे व चिपळूण शहरातील प्रांत कार्यालय ते पाग दरम्यान उड्डाण पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्या बरोबरच पिंपळी ते कुंभार्ली घाटमाथा अशा 21 कि.मी. रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तत्काळ ही कामे मार्गी लावण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्गच्या मुख्य अभियंत्यांना दिला आहे.

सावर्डे येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थांसह आ. शेखर निकम आग्रही होते. या उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेत्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आ. निकम सातत्याने सावर्डेत उड्डाण पुलासाठी आग्रही होते. मात्र, हे काम मंजूर होत नव्हते. दरम्यानच्या काळात चिपळुणातील प्रांत ऑफिस ते पागनाका दरम्यान उड्डाण पूल व्हावा ही मागणी जोर धरू लागली. भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले होते. याची तत्काळ दखल घेत मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही कामे मार्गी लावण्याचा आदेश संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना दिला.

या बाबतच्या माहितीनुसार, राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण यांनी संबंधित विषयासंदर्भात घेतलेल्या बैठकीत वरील महत्त्वाचे दोन निर्णय घेतले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झारापपर्यंतच्या प्रलंबित दुपदरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी वरील मार्गावर किमान दोन पदरी रस्ता तयार करण्यात यावा, रायगडमधील पळस्पे ते इंदाूपर, रत्नागिरीमधील आरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्याचा यामध्ये समावेश आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ना. चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिले आहेत तर गुहागर-चिपळूण-कराड महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील पिंपळी बु. ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) अशा 21 कि.मी. रस्त्याचे दुपदरीकरण करण्याबाबत निर्णय झाला. या 21 कि.मी. भागातील चिपळूण पिंपळीपासून कुंभार्ली घाटमाथ्यासह? ? हेळवाकपर्यंत रस्त्याचे दुपदरीकरण करणे कामाचा चालू वर्षाच्या आर्थिक आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार ना. चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता यांना या संदर्भात सूचना दिल्या तर चिपळूण शहराच्या दृष्टीने गेली काही वर्षे सतत पाठपुरावा व मागणी करून पाग नाक्यापर्यंत सुमारे 700 मीटर लांबीचा उड्डाण पूल व्हावा हा प्रस्ताव देखील ना. चव्हाण यांनी मान्य केला. सावर्डेतून सुमारे 1 हजार 200 मी. लांब उड्डाण पूल उभारणे प्रस्तावाचा चालू आर्थिक आराखड्यात समावेश केला.

एकूणच ना. चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत चिपळूण शहरातून 700 मी. लांबीचा उड्डाण पूल नव्याने करण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे तर सावर्डे बाजारपेठेत देखील 1250 मी. लांबीच्या उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात येत आहे. कोकणातील महामार्गावर असलेली प्रलंबित रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने संबंधित कामे चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजूर करून घेण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षातील कामे सुरू करण्याचे निर्देशही ना. चव्हाण यांनी दिले आहेत.

Back to top button