बेकायदा मालमत्ताप्रकरण : आ. राजन साळवींची ‘लाचलुचपत’कडून चौकशी | पुढारी

बेकायदा मालमत्ताप्रकरण : आ. राजन साळवींची ‘लाचलुचपत’कडून चौकशी

अलिबाग : रमेश कांबळे : आमदार राजन साळवी यांची बेकायदा मालमत्ताप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबागमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी, भाऊ व दोन मुले व त्यांचे सी. ए. अशा सहाजणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात ते दाखल झाले. तब्बल पाच तास त्यांची आणि कुटूंबियांची चौकशी करण्यात आली. उद्या बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आमदार राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर विधानसभा मतदार संघाचे ठाकरे गटातील आमदार आहेत. त्यांच्याविषयी, तसेच कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशीचा ससेमिरा शिंदे सरकारने डिसेंबर 2022पासून सुरु ठेवला. त्यानंतर 20 जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. पुन्हा त्यांना चौकशीसाठी कुटुंबियांसमवेत हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार 18 एप्रिल रोजी राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा साळवी, भाऊ दिपक साळवी, मुलगे शुभम व अर्थव तसेच सी.ए. असे सहा जण चौकशीसाठी अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उप अधीक्षक कार्यालयात अकरा वाजून वीस मिनीटाने सुमारास दाखल झाले. साडेअकरा वाजल्यापासूनसंध्याकाळ पर्यंत ही चौकशी सुरुच होती.

Back to top button