नारळाच्या प्रदेशात नारळ झालाय दुर्मिळ | पुढारी

नारळाच्या प्रदेशात नारळ झालाय दुर्मिळ

श्रीवर्धन; समीर रिसबूड :  श्रीवर्धन तालुक्यात सुपारी उत्पादनानंतर बारमाही उत्पादन देणारा नारळ. तालुक्यातील सुपारी बागायतदारांनी आपापल्या वाड्यांमधून सुपारी खालोखाल नारळांच्या माडांची लागवड केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात नारळाचे क्षेत्रफळ ४६४ हेक्टर असुन २८९ हेक्टर मध्ये उत्पन्न मिळते. साधारणतः एक हे. मध्ये २२,५०० नारळ मिळत होते. परंतु निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात १३७ हेक्टरमधील माडांची मोडतोड झाल्याने एका हेक्टमध्ये जेमतेम १००० च्या आसपास नारळ मिळू लागले आहेत.

श्रीवर्धन तालुक्यात आंबा हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. परंतु आंबा हे फळ हंगामी असल्यामुळे बागायतदार आंबा उत्पादनावर अवलंबून न राहता बाराही महिने उत्पन्न देणाऱ्या सुपारी आणि माडांची लागवड करतात. तालुक्यात सुपारी, नारळाला पोषक वातावरण व काळीभोर माती असल्याने बागायतदारांचे हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन हे सुपारी, नारळांच्या वाड्या आहे. प्रयोगशील बागायतदारांनी बाणावली (वेस्ट कोस्ट टॉल), सिंगापुरी, प्रताप, चंद्रकल्प या सुधारीत जातींची लागवड केली. काळ्या मातीत येणारा नारळ हा आकाराने मोठा असल्यामुळे वाशी, पुणे येथील फळबाजारांमधे तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली येथील बाजारात श्रीवर्धन तालुक्यातील नारळांना चांगला भाव मिळत होता.

१३ जून २०२० सालात झालेल्या निसर्ग चक्रिवादळात श्रीवर्धन तालुक्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. आंबा, सुपारीची झाडे वाऱ्यामुळे भुईसपाट, तर ३० ते ५० मी. उंचीचे माड डोळ्यादेखत पडले तर काही माड वाऱ्याने मधोमध मोडलेत. वाऱ्यातून ८ ते १० वर्षाचे व कमी उंचीचे माड बचावले परंतु माडांचे शेंडे वाऱ्याने फिरल्याने साहजीकच त्याचा परिणाम फळधारणेवर झाला. माडावर नवीन पेंड आली तरी फळ आकाराने लहान असताना गळून पडणे, फळ पुर्ण तयार होण्याअगोदरच सुखणे, देठाकडून फळाला खड्ड्यासारखा आकार होणे, झाप पिवळे होणे किंवा सूखणे तसेच वाऱ्यामुळे कमी उंचीच्या माडांचे बुंधे हलल्याने बुंध्यात वाळवी सारखी कीड लागल्याने नारळाचे उत्पादन दिवसेंदिवस अल्प प्रमाणात होऊ लागले आहे. ज्या नारळाच्या माडाला कल्पवृक्ष, बहुवर्षायु, बहुउपयोगी असे झाड म्हणतात त्याच नारळांची अवस्था श्रीवर्धन तालुक्यात बिकट झाली आहे.

नारळाच्या प्रदेशात लहानाचे मोठे झालेले बागायतदार निसर्ग व ताऊक्ते चक्रिवादळानंतर हवालदिल झाले आहेत. नारळ आकाराने लहान येत असल्याने शहरातील बाजारांमधुन येणारी मागणी घटली. नारळाच्या प्रदेशातच आजच्या घडीला फळबाजारातून नारळ श्रीवर्धन तालुक्यात विक्रीसाठी आणावे लागतं आहेत. वाड्यांमधुन काही नारळांचे माड उभे आहेत, परंतु दोन वर्षातील खराब वातावरणामुळे माडांवर सोंड्या भुंगा, झापांवर येणारा कोळी, करपा या रोगांमुळे नारळ उत्पादक चिंतेत आहेत.

Back to top button