कोकणात पिकणार सुगंधी तांदूळ; शिरगाव केंद्राचे संशोधन | पुढारी

कोकणात पिकणार सुगंधी तांदूळ; शिरगाव केंद्राचे संशोधन

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकणच्या लाल मातीची चव हापूस व काजूच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोहोचली आहे. याच लाल मातीतील तांदळाचे वाण बासमतीला टक्कर देण्यास सज्ज झाले आहे. सुपर बासमतीमधून विकसित करण्यात आलेल्या सुगंधीत वाणाचा दरवळ सातासमुद्रापार जाणार आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव येथील भात संशोधन केंद्रातील संशोधकांनी ‘रत्नागिरी 15 एम.एस.52’ हे नवीन वाण विकसित केले आहे. बासमतीप्रमाणेच लांब असणार्‍या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.

कोकणातील माणसाला ताटात थोडासा भात असल्याशिवाय आणि भात खाल्ल्याशिवाय जेवल्याचे समाधान मिळत नाही. त्याच भातप्रेमी कोकणवासीयांसाठी आता खास गोड बातमी आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्राने भातावर संशोधन करीत अनेक जाती यापूर्वी विकसित केल्या आहेत. आता बासमतीप्रमाणेच बारीक लांब भाताचे सुगंधीत वाण विकसित करण्यात यश आले आहे. 2024-25 या खरीप हंगामात हे वाण शेतकर्‍यांसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणचा हा बासमती तांदूळ खायला मिळेल.

Back to top button