कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग विमानतळ लोकार्पण सोहळा शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी होत असून मुंबईहून येणारे पहिले विमान निमंत्रितांसाठी आहे तर रविवार दि. 10 ऑक्टोबरपासून विमानातून नियमित प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. विशेष म्हणजे विमानतळ लोकार्पण सोहळ्यापूर्वीच जिल्हावासियांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दि. 30 ऑक्टोबरपर्यंत विमानाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली.
सिंधुदुर्ग विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर खा. विनायक राऊत यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग विमानतळाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, आयआरबीचे अधिकारी किरणकुमार, राजेश लोणकर व एमआयडीसीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेत परिपुर्ण आढावा घेतला. त्यानंतर खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, चिपी सरपंच गणेश तारी, अतुल बंगे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले की, परुळे-चिपी येथे साकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळला सिंधुदुर्गवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हावासियांच्या या प्रतिसादामुळे लवकरच अजुन एक एअर इंडियाचे विमान सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रात सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होणार आहे.
विशेष म्हणजे आता सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आणखी काही खासगी कंपन्या सेवा देण्यासाठी इच्छुक झाल्या आहेत. त्याबाबतचा सर्व्हे विमान कंपन्यांनी केला आहे. खरं तर सिंधुदुर्ग वासिय चांगल्या कामाला नेहमीच चांगला प्रतिसाद देत असतात. तसाच प्रतिसाद सिंधुदुर्ग विमानतळावरून सुरू होणार्या विमान सेवेलाही दिल्यामुळे जिल्हा वासियांचा सन्मान म्हणून आणखी एक नवीन दुसरे विमान मुंबई-सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग- मुंबई अशी सेवा देण्यासाठी चालू करत आहोत असे खा. राऊत यांनी सांगितले.