शिवसेनेच्या खेळीने काँग्रेसचा रिव्हर्स गिअर; बाळासाहेब थोरातांकडून मोठे संकेत | पुढारी

शिवसेनेच्या खेळीने काँग्रेसचा रिव्हर्स गिअर; बाळासाहेब थोरातांकडून मोठे संकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेस मंजुरी देवून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच गोची केल्याचे स्पष्ट होत आहे. या खेळीमुळे सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणार्‍या काँग्रेसने रिव्हर्स गिअर टाकला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महापालिका निवडणुका महाविकासआघाडीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पक्षवाढीसाठी काँग्रेस पक्ष राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची गर्जना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सर्व प्रथम केली होती. पटोले यांच्या या गर्जनेमुळे महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही पटोले यांच्या सूरात सूर मिसळत स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली होती.

दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडूनही स्वबळाच्या घोषणा झाल्या. राज्यात सरकार असल्याने महापालिका निवडणुकीसाठी आपलेच नगरसेवक जास्त निवडून यावेत, यासाठी भाजपने आणलेली चार सदस्यीय प्रभाग रचना मोडीत काढून एक सदस्यीय वॉर्ड किंवा दोन सदस्यीय प्रभाग करण्याचे संकेत दिले जात होते.

मात्र, शिवसेनेने राजकीय खेळी करत मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी देवून काँग्रेस-राष्ट्रवादीवर मात केली. तीन सदस्यीय प्रभाग रचना भाजपला फायदेशीर ठरण्याची शक्यता राजकीय नेते आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम स्वबळाचा नारा देणार्‍या काँग्रेसवर आपल्याच भूमिकेवरून युटर्न घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकही तिघांनी एकत्रित लढण्याचा आमचा विचार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पुण्यात म्हटले. यामुळे तीन सदस्यीय प्रभाग रचना आणून शिवसेनेने काँग्रेसला भूमिका बदलण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका निवडणुका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरून अनेक मतमतांतरे होती. एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग असावा, असे आमचे मत होते. यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येकाने आपली बाजी मांडण्याचा प्रयत्न केला. याला प्रभाग रचनेवरून मंत्री मंडळ बैठकीत वाद झाले, असे म्हणता येणार नाही. शेवटी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीलाही आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची आमचा प्रयत्न आहे.
– बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

हेही वाचलत का?

Back to top button