सोलापूर : सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला पावणार ‘देव’ | पुढारी

सोलापूर : सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला पावणार ‘देव’

जगन्‍नाथ हुक्केरी; सोलापूर : कोरोना महामारीने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण करत सगळ्या उत्सव व उत्साहावर पाणी फेरले. यात देवांची मंदिरेही सुटली नाहीत. आता घटस्थापनेपासून म्हणजे गुरुवारी 7 ऑक्टोबरपासून बंद धार्मिक स्थळांची दारे उघडणार आहेत. यामुळे प्रासादिक साहित्यांसह हार, फुले विक्रीवर अवलंबून असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला ‘देव’ पावणार आहे.

मार्चपासून देशात कोरोनाने कहर केला. यामुळे टाळेबंदीही करण्यात आली. वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आल्याने नागरिकांची वाहतूकही ठप्प झाली. श्रद्धास्थान असलेली धार्मिक ठिकाणेही कुलूपबंद करण्यात आली. नागरिकही घरातच अडकून पडले. गर्दीतून कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे सण, उत्सव, यात्रा, जत्रा, उरुस यावरही निर्बंध घालण्यात आले. यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना देवाच्या धावाही करणे कठीण झाले. कोरोनाची परिस्थिती ओसरु लागल्याने गतवर्षी मंदिरे उघडण्यात आली. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. सर्वकाही सुरळीत होत असताना पुन्हा कहर झाला.

मार्चमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हल्ला करण्यास सुरुवात केल्याने निर्बंधाचा निर्णय घेत पुन्हा मंदिरे बंद करण्यात आली. यामुळे दान, देणगीही बंद झाली. पूजा, विधी, पौरोहित्यासह इतर धार्मिक कार्य करणार्‍यांची उपासमार सुरू झाली. फळे, नारळ, हार, प्रासादिक साहित्य विक्री करणार्‍यांना तर आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. पूर्णपणे त्यांचे अर्थकारण कोलमडले. त्यांना कोणीच मदत केली नाही. यामुळे त्यांचे फारच हाल झाले. आता घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे सुरू होणार असल्याने ऐन नवरात्रामध्ये मंदिरा-मंदिरामध्ये पुन्हा भक्‍तीचा मळा फुलणार आहे.

मंदिरावर अवलंबून असलेले हॉटेल, वाहतूक व्यवस्था, निवास म्हणजे लॉजसह इतरांचे अर्थकारणही आता पूर्वपदावर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोरोनामुळे दीड वर्षात झालेले नुकसान मात्र कधीच भरुन निघणार नाही, अशा भावना व्यक्‍त होत आहेत.

मंदिरे सुरू होणार असल्याने आम्हाला फायदाच होणार आहे. आतापर्यंत फारच नुकसान झाले आहे. तिसरी लाट येऊच नये. दर्शन करताना सगळ्यांनी नियम पाळावा. प्रशासनाला सहकार्य करावे.
– वैभव परदेशी, विक्रेते, प्रासादिक वस्तू, सोलापूर

मंदिरे उघडण्याच्या निर्णयामुळे आनंद वाटत आहे. मोठ्या प्रमाणात भाविक यावेत. आतापर्यंत उसने, व्याजाने पैसे काढून दुकान भाडे, वीज बिले भरलेली आहेत. आता विक्रीतून चार पैसे मिळतील. संसाराला हातभार लागेल.
– गजानन भोसले, कुंकू, बुक्का विक्रेता, पंढरपूर

पंढरपूर, अक्‍कलकोटकरांना मोठा फटका

कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकर्‍यांना मुकावे लागले. शासनाने आषाढी, कार्तिक, माघी व चैत्री या चार प्रमुख एकादशांबरोबरच 15 दिवसांच्या एकादशीला गर्दी न करण्याचे आदेश देत जमाव बंदी केली. अक्‍कलकोटच्या स्वामी भक्‍तांनाही जयंती, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांच्या दर्शनाला मुकावे लागले. भाविकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. जिल्ह्यातील वडवळ, मार्डी, बार्शी, नान्नज, हैद्रा, बर्‍हाणपूर, हत्तरसंग कुडल येथील मंदिरेही बंद असल्याने प्रासादिक वस्तू विकणार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचलत का?

Back to top button