नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : leopard : भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीम व वन विभागाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली
शुक्रवारी (दि. १) पहाटे नारायणगाव जवळील नारायणवाडी शिवारातील बोरपटी परिसरातील सुरेखा वसंतराव खैरे यांच्या शेतामधील विहिरीत एक बिबट्या leopard पडला. येथील शेतकरी बालाजी घोलप हे विहिरीजवळून जात असताना त्यांना विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला.
त्यांनी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्यासह माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्यासह बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य तसेच वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
बिबट्या विहिरीत पडल्याची खबर परिसरात वार्यासारखी पसरल्यानंतर स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. सकाळी साडे आठच्या दरम्यान या बिबट्याला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व बिबट रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी विहिरीत शिताफीने पिंजरा सोडून काही मिनिटात बिबट्याला बाहेर काढले व त्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
या यशस्वी रेस्क्यू कारवाईसाठी जुन्नरचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे, एसओएस संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, महेंद्र ढोरे, वनपाल मनीषा काळे, नितीन विधाटे, वनरक्षक रमेश खरमाळे, नारायण राठोड, स्वरूप रेंगडे, निलेश विरणक, संजय गायकवाड, रामेश्वर फुलवाड वनकर्मचारी खंडू भुजबळ, पंढरी भालेकर, बाबू नेहरकर, रेस्क्यू टीम मेंबर किरण वाजगे, रमेश सोलाट, आकाश डोळस, वैभव गावडे, जितेंद्र भोर तसेच स्थानिक नागरिक आशिष वाजगे, मिलिंद वाजगे, संतोष ब. वाजगे, विश्वास पाटे, वसंत वाघ, गुलाब वाघ, राहुल वाजगे, संजय आरोटे, सुहास वारूळे तसेच भिल्ल वस्ती, वाजगे वस्ती येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
हे ही वाचलं का?