washim ZP election : वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट | पुढारी

washim ZP election : वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट

वाशिम; अजय ढवळे : राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले पक्ष पोटनिवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा देत उमेदवार उभे केले आहेत.

वाशिम जिल्ह्यात washim ZP election वंचित व जनविकास आघाडीची युती असून, इतर पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अधिक आरक्षण होत असल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त ठरविण्यात आल्या. त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ५ ऑक्टोबरला मतदान व ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ रिक्त गटांसाठी ८२ तर २७ पंचायत समितीच्या गणांसाठी १३५ पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. प्रचार मोहिमेला सुरुवात झाली असून नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

ओबीसी आरक्षण रद्द होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12, काँग्रेस 10, वंचित 8, भाजपा 7, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी 7, शिवसेना 6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते. त्यात न्यायालयाच्या आदेशाने इतर मागास प्रवर्गाच्या 14 जागा रिक्त झाल्या असून वंचीत बहुजन आघाडीच्या चार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, भाजप व जन विकास आघाडीच्या प्रत्येकी दोन, काँग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक तर अपक्षाची एक जागा रिक्त झालेत .त्यामुळं या जागेवर पोटनिवडणुकीला समोर जावं लागतं आहे.

washim ZP election  : शेवटच्या दिवसापर्यंत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा

वाशिम जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दुसरीकडे आघाडीसंदर्भात स्थानिक स्तरावर बोलणी सुरूच होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, अंतिम क्षणापर्यंत महत्त्वाच्या काही जागावाटपाचा तिढा सुटला नाही.

अखेर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मूठमाती देत पक्षांनी स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपही स्वबळावरच निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत वंचित व जनविकास आघाडी एकत्र आली, तर कारंजा तालुक्यातील भामदेवी गटात राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी आपला उमेदवार मागे घेतला आहे.

पक्षांच्या स्वबळामुळे निवडणुकीतील रंगत वाढली असून हे समीकरण कुणाच्या पथ्यावर पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेमध्ये washim ZP election महाविकास आघाडीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद काँग्रेसला उपाध्यक्ष तर शिवसेना आणि आणि वंचितला सभापती पद दिले होते. मात्र ओबीसी आरक्षणावरून रिक्त झालेल्या 14 गटात पोटनिवडणुक होणार असून, या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मूठमाती देत पक्षांनी स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे पुढचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

हे  ही वाचलं का?

Back to top button