रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचे निधन | पुढारी

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचे निधन

मंडणगड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पाले गावात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे मंगळवारी (दि.२७) दापोली येथे निधन झाले. चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्यशासन सतर्क झालेले असताना स्थानिक आरोग्य यंत्रणा मात्र, अद्याप तितकीशी गंभीर नसल्याची गंभीर बाब या निमित्ताने पुढे आली आहे.

पाले येथील रुग्णाला दम्याचा त्रास होता. तपासणीसाठी तो रूग्ण रुग्णालयात आला असता डॉक्टरांना संशय आला. त्याची अँटीजन टेस्ट ग्रामीण रुग्णालयात केली असता तो पॉझिटीव्ह आढळला. त्याची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी त्यास दापोली येथे पाठवण्यात आले. या रुग्णावर तेथेच उपचार करण्यात येत होते. दरम्यान, मंगळवारी त्याचे निधन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

आरोग्य यंत्रणा अद्याप सतर्क झालेली नाही. ग्रामीण रुग्णालात अधीक्षकांसह दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. परंतु केवळ एकच वैद्यकीय अधिकारी हजर असल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सोयी सुविधांची येथे उपलब्धता केली आहे. मात्र, आवश्यक असणाऱ्या डॉक्टर्सची वानवा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात सर्वांनाच मास्क सक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button