सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील मनसेच्या 15 जणांवर गुन्हे | पुढारी

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील मनसेच्या 15 जणांवर गुन्हे

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणार्‍या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी येथील विभागीय पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार्‍या मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. राजू कासकर यांच्यासह 15 जणांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गैरकायदा जमाव करून घोषणाबाजी करणे व मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित पदाधिकार्‍यांना शनिवारी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पुणे येथे काही मुस्लिम युवकांनी पाकिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी या घटनेविरोधात मनसेच्या सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यासह मनसे पदाधिकारी प्रसाद गावडे (कुडाळ), प्रवीण गवस, दीपक गावडे, कुणाल किनळेकर, मंदार नाईक, शुभम सावंत सर्व रा. सावंतवाडी) आदी 15 जणांनी सावंतवाडी येथील विभागीय पोलिस अधीक्षक रोहिणी सोळंके यांना लेखी निवेदन सादर केले आणि कार्यालयासमोर निदर्शने केली होती. तसेच अशा प्रकारे घोषणा देणार्‍या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यादरम्यान जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जमावबंदी आणि मनाई आदेश जारी केले होते. त्यामुळे या सर्व विरुद्ध आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी या सर्वांना नोटीशा जारी केल्या आहेत

Back to top button