सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात मोठी दरड; मार्ग ठप्प; फोंडाघाटमार्गे वाहतूक वळवली | पुढारी

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात मोठी दरड; मार्ग ठप्प; फोंडाघाटमार्गे वाहतूक वळवली

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : भुईबावडा घाटात दरड कोसळून रस्ता तुटून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली आहे. दरड कोसळल्यामुळे घाटात दोन्हीही बाजूला काही वाहने अडकून पडली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दरडीमुळे रस्ता तुटल्यामुळे घाटातील वाहतूक लवकर सुरू होण्याची शक्यता कमी आहे. या घाटातील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.

तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. सह्याद्री परिसरात पडणार्‍या पावसाने भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे. गुरुवारीही दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. शुक्रवारी दुपारी पुन्हा गगनबावड्यापासून मागे 4 कि.मी.अंतरावर भुईबावडा घाटात डोंगरातून भूस्खलन झाल्यासारखी भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. ही दरड इतकी मोठी होती की या दरडीच्या दणक्याने घाटातील रस्ताच तुटून गेला आहे. दरड पडल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.व्ही. जोशी व शाखा अभियंता कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दरड हटविण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू करण्यात आले आहे. दरड हटविली तरी रस्ता दरडीमुळे रस्ता खचल्यामुळे वाहतूक लवकर सुरू होणे अवघड बनले आहे.

वैभववाडी तालुक्यातील करुळ व भुईबावडा हे दोन महत्त्वाचे घाटमार्ग आहेत. रविवारी करुळ घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे घाटातील अवजड वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. तर हलकी वाहतूक शनिवारपासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सध्या भुईबावडा घाटातून जड वाहतूक सुरु होती. मात्र, भुईबावडा घाटातही दरड कोसळून रस्ता तुटल्यामुळे वैभववाडी तालुक्याचा कोल्हापूरशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.

Back to top button