रत्नागिरी : आ. साळवींसाठी उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप | पुढारी

रत्नागिरी : आ. साळवींसाठी उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप

राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेवर आलेल्या कठीण काळात बंडखोरांकडून मिळालेल्या आमिषांना धुडकावून लावीत पक्षनिष्ठा दाखविणारे शिवसेनेचे उपनेते, आमदार राजन साळवी यांच्या निष्ठेची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आमदार साळवी यांना पत्र पाठवून कौतुकाची थाप मारली आहे.

गेले काही महिने शिवसेनेत एक जबरदस्त वादळ सुरु असून त्यातून मोठी राजकीय पडझड झाली आहे सुमारे अडीच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार त्यातून पायउतार झाले शिवसेनेतील अनेक आमदारान्नी पक्षाशी बंड करुन नवा गट स्थापन करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षादरम्यान पक्षासमवेत राहिलेल्या आमदारांना आमिषे दाखविली गेल्याचे आरोप राजकीय वर्तुळात पहायला मिळाले या सर्व घडामोडी घडत असताना राजापूरचे सेना आमदार राजन साळवी यांनी पक्षनिष्ठेसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाशी एकनिष्ठा दाखविली होती. त्याची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली व त्यांना उपनेतेपदी बढती दिली गेली.

शिवसेनेतून वेगळे झालेल्या शिंदे गट व भाजपचे सरकार राज्यात अधिकारपदी येताच जाहीर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. राजन साळवींना उमेदवारीही दिली होती. पक्ष संकटात असताना आमदार साळवी यांनी पक्षनिष्ठा दाखविली होती. त्याची दखल पक्षनेतृत्वाने घेऊन आमदार साळवी यांना पत्र पाठवूनत्यांचे कौतुक केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिले आहे.

कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो, अशा सदिच्छा शिवसेना पक्षप्रमुखांनी लिहिलेल्या त्या पत्रात सेनेचे उपनेते, आमदार राजन साळवी यांना दिल्या आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या त्या पत्रानंतर शिवसैनिकांकडून देखील आमदार साळवी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Back to top button