रत्नागिरी : गेला पाऊस कुणीकडे..? | पुढारी

रत्नागिरी : गेला पाऊस कुणीकडे..?

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा;गेले दोन दिवस हुलकावणी देणार्‍या पावसाने बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शविली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली. जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब झाल्याने जिल्ह्याच्या खरीप लागवड क्षेेत्रात मान्सूनच्या सक्रियतेबाबत साशंंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत कोकण किनारपट्टीत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने कायम ठेवली आहे.

गुरुवारी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 6.44 मि. मी. च्या सरासरीने एकूण 58 मि. मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात झाली. तालुक्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार सक्रियता दाखविली. तालुक्यात 25 मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दिवसभर उसंत घेतल्याने कडकडीत उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. अन्य तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र त्यामध्ये जोर नव्हता. दापोली तालुक्यात 18 मि.मी., चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी 5 मि.मी. तर मंडणगड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 2 मि.मी. पावसाची नोंद झाली.

कोकणात मान्सून सक्रिय होण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 29 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. यावेळीही मान्सूनने दहा दिवसांचा ब्रेक घेतला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र याच आठवड्यात रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस गायब झाला. यामुळे आता पाऊस नेमका कधी पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मान्सून थांबल्यामुळे शेतकर्‍यांनाही पेरणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 48 तासांत तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र याबाबत अजूनही शक्यता कमीच आहे.

गेले पंधरा दिवस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाबाबतही आता शेतकर्‍यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. गेला आठवडाभर पावसाच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाचे आडाखे चुकत आहे. त्यात मान्सूननेही सक्रिय होण्यात विलंब लावल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. आठवडाभर पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे लावणीच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पेरणी केल्यानंतर आता पाऊस गायब झाल्याने तयार केलेल्या भाताच्या वाफ्यांना नळाद्वारे पाईपने शिंपावे लागत आहे. जमिनी कोरड्या राहू लागल्याने उकरणीतही वेळ लागत आहे. त्यामुळे पुढील कामांचे वेळापत्रकही बदलावे लागणार आहे.

– सदाशिव बंडबे, शेतकरी

Back to top button