शासकीय गोदामात ढीसाळ कारभार; पूर ग्रस्तांसाठीची सडली तूरडाळ | पुढारी

शासकीय गोदामात ढीसाळ कारभार; पूर ग्रस्तांसाठीची सडली तूरडाळ

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्तांना वितरित करण्यासाठी आलेली सुमारे 169 क्विंटल तूरडाळ चिपळूण येथील शासकीय गोदामात गेले वर्षभर पडून आहे. रेशन दुकानांना पुरवठा करून उरलेली डाळ वर्षभर पडून असल्याचे उघड झाल्यानंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आता ही डाळ पूर्ण सडली असून, तिची विल्हेवाट लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

पुरवठा विभागाने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर हजारो क्विंटल तूरडाळ कुजण्याच्या मार्गावर आली आहे. अन्य पाच ते सहा तालुक्यांत असाच प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे हे धान्य अशा रीतीने वाया गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण तालुक्यातील रेशन दुकानांत वितरण करण्यासाठी वर्षभरापूर्वी शासनाकडून तूरडाळ शासकीय गोदामात पाठवण्यात आली होती. मुळातच ही तूरडाळ निकृष्ट दर्जाची होती. ती खाण्यास योग्य नसल्याने रेशनिंग दुकानदारांनी तूरडाळ घेण्यास चक्क नकार दिला होता. ग्राहक अशी तूरडाळ घेत नाहीत, तूरडाळ खराब आहे असे कारण देत रेशनिंग दुकानदारांनी तूरडाळ घेण्यास नकार दिल्याने ती तूरडाळ गोदामात तशीच पडून राहिली.

शासनाकडून आलेली तूरडाळ निकृष्ट असून, ती खाण्यास योग्य नाही, असा पत्रव्यवहार चिपळूण येथील पुरवठा विभागाने रत्नागिरी येथील पुरवठा विभागाकडे केला होता. तसेच पुणे येथील पुरवठा विभागाकडेदेखील तसा पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु वरिष्ठ विभागाने किंवा शासनाने देखील त्याची कोणतीच दखल घेतली नाही. अखेर वर्ष उलटले तरी निकृष्ट तूरडाळीचा साठा अद्यापही येथे पडून आहे.

अशी निकृष्ट डाळ संबंधित ठेकेदाराने का पाठवली? डाळ पाठवताना त्याची तपासणी योग्य त्या प्राधिकरणाकडून झाली होती की नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. गोरगरिबांना देण्यासाठी उपलब्ध झालेले हे धान्य आशा पद्धतीने वाया का घालवण्यात आले? वरिष्ठ विभागाने वेळीच त्याची दखल का घेतली नाही? असे अनेक मुद्दे उपस्थित करत संताप देखील व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षात आलेली तूरडाळ ही निकृष्ट आणि खाण्यास योग्य नाही. दुकानदार ती घेत नाहीत, अशा प्रकारचा पत्रव्यवहार वेळोवेळी संबंधित वरिष्ठ विभागाकडे करण्यात आलेला आहे. त्यामुळे डाळीचा साठा गोदामात मुद्दाम ठेवला आणि सडवला हे साफ चुकीचे आहे.
– तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण

Back to top button