दोडामार्ग येथे ट्रकसहित २६ लाख ४० हजारांची दारू जप्‍त | पुढारी

दोडामार्ग येथे ट्रकसहित २६ लाख ४० हजारांची दारू जप्‍त

दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी 26 लाख 40 हजारांची गोवा दारू व ट्रकसहित एकूण 41 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. या बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी संशयित राहुल संपत कदम (वय 34 रा. डिक्सल, ता. मोहोळ, सोलापूर) व दीपक कडेकर (32, रा. शेलूर, पो. आंबेठाण, ता. खेड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली.

राहुल कदम व दीपक कडेकर हे ट्रक घेऊन गोवा ते दोडामार्गमार्गे कोल्हापूर असा प्रवास परत होते. मंगळवारी रात्री उशिरा दोडामार्ग येथील राज्य सीमा तपासणी नाक्यावर हा ट्रक आला असता पोलिसांनी तपासणीसाठी ट्रकला थांबविला.

दरम्यान, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांना माहिती दिली. रिझवान नदाफ, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, कुलदीप पाटील यांच्यासह पोलिस नाईक अनिल पाटील, सुभाष गवस, संजय गवस, सुरजसिंग ठाकूर व दीपक सुतार यांनी तपासणी नाक्यावर जात ट्रकची कसून तपासणी केली असता ट्रकमध्ये भुशाने भरलेली पोती व त्या भुशामध्ये गोवा दारूचे बॉक्स आढळून आले.

यानंतर हा ट्रक ताब्यात घेत तो दोडामार्ग पोलिस ठाण्यात आणला. ट्रक तपासणी करण्यासाठी रिजवाना नदाफ यांनी 15 नागरिकांना मदतीसाठी बोलावले. पोलिसांनी त्यांच्या साथीने सर्व पोती तपासण्यास सुरुवात केली.

तब्बल साडेतीन तासांच्या तपासणीअंती जवळपास 26 लाख 40 हजारांची गोवा दारू या सर्व पोत्यांमध्ये सापडून आली. यात रॉयल ब्लू कंपनीची 14 लाख 40 हजारांची तर रॉयल ब्लॅक कंपनीची 12 लाखांची दारू होती. ही सर्व दारू पोलिसांनी जप्त केली.

शिवाय दारू वाहतुकीसाठी वापरलेला 15 लाखाचा ट्रक जप्त करत वरल दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ),(इ), 81, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोंदा,तिरोडा येथे 15 हजारांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा : आरोंदा आणि तिरोडा येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई करत पोलिसांनी 15 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिरोडा येथे मेरी डिसोजा आणि आरोंदा येथे आरफान फर्नांडिस यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

तिरोडा येथे हातभट्टीची 4200 रुपये किमतीची तर आरोंदा येथे अकरा हजार रुपयांची गोवा दारू पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.

Back to top button