मंत्री अनिल परब यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्याचा गोंधळ; एसपींनाच केली दमदाटी | पुढारी

मंत्री अनिल परब यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्याचा गोंधळ; एसपींनाच केली दमदाटी

दापोली, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता पालकमंत्री परब यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत म्हणाला की, “आधी एसटी सुरू कर, मग भाषण दे”, अशा पद्धतीने एकेरी भाषेत बोलत भर भाषणात कार्यकर्त्याने गोंधळ घातला.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीही या कार्यकर्त्याने शांत राहण्यास सांगितले आणि दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. सोहळा पाडल्यानंतर संबंधित कार्यकर्त्याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यात राजकीय मध्यस्थी होताच त्याच्याकडून लेखी घेत सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले.

शिवपुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी राजकीय वातावरण तापले होते. त्यात अनिल परब हे या अनावरण सोहळ्याचे सूत्रधार आहेत, असा सूर देखील यावेळी निघत होता. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस ठेवला होता. तरीही पालकमंत्री यांच्याबाबत अपशब्द काढून संबंधित कार्यकर्त्याला दापोली पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी परिस्थितीचे भान ओळखून या समर्थकास समज देऊन सोडून दिले आहे. मात्र या प्रसंगाची चर्चा दापोलीत सुरू आहे.

Back to top button