गुहागर : कोकणी शिमगोत्सवात संकासुराची धूम; आधुनिक जगात कोकणची लोककला कायम | पुढारी

गुहागर : कोकणी शिमगोत्सवात संकासुराची धूम; आधुनिक जगात कोकणची लोककला कायम

गुहागर; आशिष कारेकर : कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्या होळीपासून सुरू होणारा हा शिमगोत्सव (Shimgotsava) येथील संकासुरामुळे अधिकच आकर्षण ठरतो. कोकणच्या शिमगोत्सवाचे आकर्षण सर्वानाच असते. मात्र, मृदुंगाच्या तालावर नाचणारे गावागावातील नमन खेळे गावभोवनीसाठी १० दिवस गावाबाहेर पडतात. यावेळी अबालवृद्ध हा संकासुर पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडतात. आधुनिक जगातही संकासुराची धूम कायम आहे.

कोकणात दरवर्षी फाल्गुन शुद्ध पंचमीला पहिल्या होळीने शिमगोत्सवाची (Shimgotsava) सुरुवात होते. यावेळी दुसऱ्या होळीपासून संकासुर आणि गोमुचा नाच घेऊन खेळे बाहेर पडतात. आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरणाऱ्या या खेळयांमध्ये संकासुर हा सर्वांचा कुतूहल बनतो. एक विशिष्ट पेहराव करून येणारा हा संकासुर देवाचे रूप मानला जातो. मूळ शंकासूर म्हणून असलेला हा संकासुर त्याच्या डोक्यावरील उंच टोपी व भयावह चेहऱ्यामुळे चांगलाच लक्ष वेधतो.

या शिमगोत्सवादरम्यान अनेक गावातील नमन खेळे १० दिवस गावभोवनीसाठी दुसऱ्या होळीपासून बाहेर पडतात. यावेळी संकासुर आणि गोमुचा नाच पाहण्यासाठी एकच झुंबड उडते. संकसुराकडून तरूणाईचा होणार पाठलागही सर्वांसाठी कौतुकाचा असतो.

कोकणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही संकासुराची प्रथा आजही तितकीच जोपासली जात आहे. विशेष करून गुहागर तालुक्यात ती अधिक जोपासली जात आहे. गुहागरमध्ये वरवेलीचा संकासुर अधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता गावागावात संकासुराची धूम सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं ‘झुंड‘विषयी ?

Back to top button