

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद मुलाची आई आणि भावाने मिळून गळा आवळून हत्त्या (murder) केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. शुभम अशोक नानोटे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरेंद्र अशोक नानोटे (वय २७) , रंजना अशोक नानोटे (वय ४७) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम नानोटे हा दारूडा असून २३ फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न झाले होते. शुभमच्या पत्नीला ओटीपोटाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले होते. परंतु पैशाची तंगी असल्याने शुभमने आई रंजना आणि भाऊ नरेंद्र यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी होऊन आई व भावाने शुभमला पैसे देण्यास नकार दिला. त्यातून वाद वाढत जाऊन आई व भावाने गळा आवळून शुभमची हत्त्या केली.
दरम्यान, आई रंजना आणि भाऊ नरेंद्रने एक कथा रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शुभमच्या डोक्याला जखम झाली होती. त्याला दवाखान्यातही नेले होते, असा दावा दोघांनी केला. मात्र, शुभमचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं 'झुंड'विषयी ?