पुणे : पुढारी वृत्तसेवा
कृषी विभागाने आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवातून शेतकर्यांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली असून, एकप्रकारे मार्केटिंगचे कौशल्य त्यातून वाढते. त्यातून शेतकर्यांनी अधिकाधिक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शेतमालाचा पुरवठा करुन आपल्या गटाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) 'विकेल ते पिकेल' या अभियानांतर्गत आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक विकास पाटील, सुभाष नागरे, विभागीय कृषी सह संचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे व अन्य अधिकारी, शेतकरी, ग्राहक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखर संकुलशेजारील कृषी भवन इमारतीच्या पाठीमागील पटांगणात हा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो मंगळवारपर्यंत (दि.15) सुरू राहणार आहे.
शेतीमालाच्या चांगल्या वाणांद्वारे दर्जेदार व अधिकाधिक उत्पादन देणारी शेतीच किफायतशीर ठरेल. सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनवाढीसाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. विविध प्रकारच्या तांदळाच्या दरातील तफावतीबाबतही त्यांनी माहिती घेतली. हळदीच्या प्रक्रियेसाठी शासन सर्वतोपरी शेतकर्यांना मदत करेल. गडहिंग्लज येथे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
महोत्सवात 110 टन तांदूळ व अन्य शेतमाल मिळून एकूण 150 टन शेतमालाची विक्री अपेक्षित आहे. महोत्सवात 62 शेतकरी गटांचे एकूण 53 स्टॉल आहेत. शेतकर्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नसून प्रत्येक स्टॉलला विद्युत पुरवठ्याची सोयसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतकर्यांचा दर्जेदार शेतमाल खरेदीसाठी पुणेकर ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दयावा.
– ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे