इस्लामपुरातील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न | पुढारी

इस्लामपुरातील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

इस्लामपूरः पुढारी वृत्तसेवा: वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिलासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत इस्लामपुरातील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि.१४) रोजी आंदोलन पुकारले होते. तासभराच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांचे गेली तेरा दिवस महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन करत आहेत. वाळवा तालुक्यातील शेतीचे वीज बील दुरुस्ती केल्याशिवाय बिले भरणार नाही. शेतऱ्यांच्या रोषाला महावितरण जबाबदार राहिल असे त्यांनी यावेळी म्हटले.

इस्लामपूर उपविभागाचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांची गाडी आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली होती. महावितरणच्या कार्यालयाला कुलपे लावताना पोलिस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये झटापट झाली. यानंतर महावितरणचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांनी वीज बिल दुरुस्तीसाठी गाव निहाय मेळावे घेतले जाणार आहेत. यात शेतकऱ्यांनी आपली वीज बिले दुरुस्त करून घ्यावेत असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक थांबले.

या आंदोलनात रवीकिरण माने, ब्रम्हानंद पाटील, शिवाजी पाटील, एस. यु. संन्दे, शिवाजी मोरे, अधिक जाधव, संजय पाटील, अवधूत जाधव, प्रदीप माने, अवधूत पाटील, किरण पाटील, किरण सुतार, रमेश पाटील, सुभाष शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. ( टाळे ठोकण्याचा प्रयत्न )

हेही वाचलंत का? 

Back to top button