कुडाळ मध्ये सेना-भाजप आमने-सामने! | पुढारी

कुडाळ मध्ये सेना-भाजप आमने-सामने!

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकालानंतर बुधवारी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला. याच दरम्यान पोस्ट ऑफिस चौकात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने- सामने आले. शिवसैनिकांनी विजयी फेरी दरम्यान केलेल्या घोषणाबाजीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिले.

दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होताच वातावरण काहीसे तंग बनले. भाजप कार्यालयाकडून मुख्य रस्त्यावर येणार्‍या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी पोलिस व भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य राजकीय राडा टळला.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या 17 जागांची मतमोजणी बुधवारी कुडाळ हायस्कूल येथे झाली. सकाळी 10 वा.पासून मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीदरम्यान पोलिस ठाणे ते अभिमन्यू हॉटेल दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. मराठा समाज हॉल तसेच पोलिस ठाणे चौकनजीक पोलिसांनी दोन्ही बाजूंना बॅरिकेडस् लावले होते. तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याद‍ृष्टीने पोलिसांनी विशेष

काळजी घेतली होती. निकालासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मराठा समाज हॉल जवळ तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशन नजीकच्या चौकात थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. पहिल्या फेरीतील पहिल्या सहा जागांचा निकालात चार जागांवर भाजप तर दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.

यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यास सुरवात केली.भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.गटनेते रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रूपेश कानडे, पप्या तवटे, माजी जि.प.अध्यक्षा सौ.दीपलक्ष्मी पडते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर,आबा धडाम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसैनिकांची घोषणाबाजी

शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे आ.वैभव नाईक यांनी अभिनंदन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशन चौक येथून शिवसेना शाखेपर्यंत विजयी फेरी काढली. पोस्ट ऑफिस चौकातील भाजपा कार्यालयासमोर फेरी येताच शिवसैनिकांनी आ. वैभव नाईक यांना उचलून घेत आ. वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद, आ. वैभव नाईक अंगार है बाकी सब भंगार है अशी जोरदार घोषणाबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी भाजपा कार्यालयासमोर उभ्या असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही राणे साहेब तुम अंगार है बाकी सब भंगार है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

त्यातच शिवसेनेची फेरी शाखेकडे मार्गस्थ होत असतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत मुख्य रस्त्यावर चाल करून येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगाडे व सहकारी पोलिसांनी भाजपा कार्यालयाकडून खाली रस्त्यावर येणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी पोलिस व भाजपा कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादाने काहीसे वातावरण तंग बनले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य राजकीय राडा टाळला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि.प.गटनेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख योगेश धुरी, उपसभापती जयभारत पालव, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, सुशील चिंदरकर, अतुल बंगे, संतोष शिरसाट, संजय भोगटे, सचिन काळप, सौ.मथुरा राऊळ, कृष्णा तेली आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचीही घोषणाबाजी आणि रॅली

राष्ट्रीय काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी होताच जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व महिला जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी यांनी कुडाळात येत विजयी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, जिल्हा बॅक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, युवक विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, समीर वंजारी, प्रसाद धडाम, गणेश भोगटे, चिन्मय बांदेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विजयानंतर पोलिस स्टेशन चौक पासून जिजामाता चौक पर्यंत काँग्रेसने विजयी फेरी काढली.

शाब्दिक बाचाबाचीची पोलिसांकडून दखल

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पायी चालत जाणार्‍या शिवसेना कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. या दरम्यान भाजप कार्यालयासमोरील चौकात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

भाजपाने आक्षेप घेतल्याप्रमाणे आपण कोणालाही रॅलीसाठी परवानगी दिली नव्हती. मात्र, नियमानुसार कोरोनाच्या अनुषंगाने मोठी गर्दी करता येत नसल्याने याबाबत वरिष्ठ स्तरावरून चर्चा करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाडे यांनी कुडाळ येथे भेट घेतली असून या अनुषंगाने कुडाळ पोलिस स्थानकात चर्चा सुरू होती.

Back to top button