जालना : राज्‍यपालांना हटवा मागणीसाठी भोकरदन बंदला चांगला प्रतिसाद | पुढारी

जालना : राज्‍यपालांना हटवा मागणीसाठी भोकरदन बंदला चांगला प्रतिसाद

भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व इतर पक्षांच्या वतीने आज (बुधवार) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला भोकरदनमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

हिंदुत्ववादी संघटना, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समविचारी पक्षांसह मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला भोकरदन शहरात चांगला तर ग्रामीण भागात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी शिवप्रेमी व मराठा क्रांती मोर्चासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी; कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्यपाल कोश्यारी यांच्या शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.

महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या शिवरायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शहरात दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या अनेक गावांत त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भोकरदन शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर ठिकाणची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.

भोकरदन बंद पाडल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे सुरेश तळेकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू गाढे, स्वराज्य संघटनेचे विकास जाधव, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष त्रंबकराव पाबळे, बळीराजा फाउंडेशनचे नारायण लोखंडे, साहेबराव झोरे, संतोष अन्नदाते, सोपान सपकाळ, आप्पासाहेब जाधव, प्रकाश देशमुख, नारायण जीवरग, गजानन घोडके, रामचंद्र गायके, अब्दुल सत्तार भाई, रमेश पगारे यांच्यासह असंख्य शिवप्रेमींची यावेळी उपस्थिती होते.
बंदचे आवाहन करताना असंख्य शिवप्रेमींनी ‘कोश्यारींना हटवा दिल्लीला पाठवा’ अशा घोषणा देऊन छत्रपती शिवरायांबद्दल यापुढेही बेताल वक्तव्य केल्याचे दिसून आल्यास कोणालाही माफ केले जाणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button