Gujarat, Himachal Election Results : गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकीचा गुरूवारी निकाल | पुढारी

Gujarat, Himachal Election Results : गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकीचा गुरूवारी निकाल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गुजरात तसेच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujarat, Himachal Election Results) गुरुवारी जाहीर केला जाणार आहे. गुजरातमध्ये भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेत येण्याचा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेस यांना सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा (Gujarat, Himachal Election Results) आहेत. या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 92 जागा प्राप्त होणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये यावेळी पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे या पक्षाच्या कामगिरीकडेही सर्वांची नजर आहे.

गुजरातच्या मतदानोत्तर चाचण्यांवर नजर टाकली तर आजतक—अॅक्सिस माय इंडियाने भाजपला 129 ते 151 जागा, काँग्रेसला 16 ते 30 जागा तर आम आदमी पक्षाला 9 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एबीपी—सीव्होटरने भाजपला 128 ते 140, काँग्रेसला 31 ते 43, आम आदमी पक्षाला 3 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टीव्हीने भाजपला 112 ते 121, काँग्रेसला 51 ते 61 आणि आम आदमी पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज वर्तवला आहे. न्यूज 24—टुडेज चाणक्यने भाजपला 150 जागांचा, काँग्रेसला 19 तर आप ला 11 जागांचा अंदाज वर्तवला आहे. टीव्ही 9 गुजरातने भाजपला 125 ते 130, काँग्रेसला 40 ते 50 तर आपला 1 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

हिमाचलमध्ये विधानसभेच्या 68 जागा असून कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी 35 जागांची गरज आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये आजतक—अॅक्सिस माय इंडियाने भाजपला 24 ते 34 तर काँग्रेसला 30 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी — सीव्होटरने भाजपला 33 ते 41 तर काँग्रेसला 24 ते 32 जागांचा, इंडिया टीव्हीने भाजपला 35 ते 40 आणि काँग्रेसला 26 ते 31 जागांचा, न्यूज 24—टुडेज चाणक्यने भाजप व काँग्रेसला प्रत्येकी 33 जागांचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे टाईम्स नाउ ईटीजीने भाजपला 34 ते 42 तर काँग्रेसला 24 ते 32 जागांचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button