जालना : जिल्ह्यात 171 क्षयरुग्ण; कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध अभियानांतर्गत उघड | पुढारी

जालना : जिल्ह्यात 171 क्षयरुग्ण; कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध अभियानांतर्गत उघड

जालना; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात 17 लाख 71 हजार 88 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यात 9 हजार 355 संशयीत रुग्णापैकी 171 क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर डॉट्स औषधोपचार सुरु करण्यात आले असल्याची माहीती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांनी दिली.

जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग व क्षयरुग्ण शोध मोहीम अभियान 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत 18 लाख 34 हजार 569 नागरीकांच्या सर्वे क्षणाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. सदर मोहीमेत 17 लाख 71 हजार 48 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यात 9 हजार 940 संशयीत रुग्ण आढळून आले. त्यापैकी 9 हजार 867 संशयीत रुग्णांच्या थुंकीचे नमुने गोळा करण्यात आले. 9 हजार 713 रुग्णांची थुंकी नमुने
तपासणी केल्यानंतर 804 रुग्णांची सिविनंट करण्यात आली. तपासणी झालेल्या रुग्णांपैकी 171 रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांच्यावर डॉट्स औषधोपचार सुरु करण्यात आले आहे.

कुष्ठरोग व क्षयरोग अभियानासाठी 1 हजार 287 सर्वेक्षण पथकाची व 257 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
सदर अभियान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. शाम गावंडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री
भुसारे यांनी राबविले असल्याची माहिती देण्यात आली

 9 कुष्ठरोगी आढळले

अभियानात जिल्ह्यात कुष्ठरोगाचे 8 हजार 777 संशयीत रुग्णांपैकी 8 हजार 771 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
त्यात 99 कुष्ठरुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे

Back to top button