अबब! विद्यार्थ्यांनी खाल्ली तब्बल 75 लाखांची अंडी? | पुढारी

अबब! विद्यार्थ्यांनी खाल्ली तब्बल 75 लाखांची अंडी?

नगर : पुढारी वृत्तसेवा : झेडपीच्या शाळेत शिकणार्‍या सुमारे चार लाख विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून आठवड्यातून एक दिवस केळी किंवा अंडी देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. शिक्षण विभागाच्या एका आकडेवारीनुसार सुमारे 1 लाख 68 हजार विद्यार्थी अंडी खात असून त्यांच्यासाठी दोन महिन्यांत सुमारे 75 लाखांची 15 लाख अंडी खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. आता 15 लाख अंड्यांच्या खरेदीवर वाढीव एक रुपयाचे अतिरिक्त अनुदान मिळावे, यासाठी झेडपीतून 15 लाखांच्या मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतून झेडपीच्या पहिली ते आठवीपर्यंत्तच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पोषक आहार देण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांची तरतूद केली आहे. या पाच रुपयांत विद्यार्थ्यांना अंडी पुरवावीत किंवा जे खाणार नसतील त्यांना पाच रुपयांची केळी द्यावीत, अशाही सूचना शासनाने केलेल्या आहेत. मात्र आता 30 रुपये डझनने केळी खरेदी केली, तरच यातून सहा विद्यार्थ्यांना दोन-दोन केळी वाटप करणे शक्य होत आहे. मात्र पाच रुपयांत अंडी विकत मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासन दरबारी ही व्यथा मांडताना अतिरिक्त दोन रुपयांची तरतूद करावी, असा सूर आळवला होता. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 या दोन महिन्यांत खरेदी केलेल्या अंड्यांच्या बिलापोटी एक रुपया अतिरिक्त देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे केळी खाणार्‍या विद्यार्थ्यांना पाच रुपये आणि अंडी खाणार्‍यांसाठी आता सहा रुपये देण्याची शासनाने तयारी दर्शविली आहे.

दरम्यान, जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत नऊ आठवडे आले होते. आठवड्यातून ठरलेल्या एका दिवसाप्रमाणे दोन महिन्यांत नऊ वेळा विद्यार्थ्यांना केळी आणि अंड्यांचा आहार दिला गेला. आता शाळांनी अंडी खरेदीच्या एक रुपयांच्या अतिरिक्त अनुदानासाठी 15 लाख 14 हजार 376 रुपयांची मागणी केलेली आहे. त्यामुळे योजनेचे लाभार्थी असलेले 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 68 हजार 264 विद्यार्थी अर्थात एकूण संख्येपेैकी 40 टक्के विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे नऊ आठवड्यात 15 लाख 14 हजार 376 अंडी खरेदी करून दिल्याचे गणित मांडले जात आहे. त्यापोटी एक रुपयाप्रमाणे 15 लाख 14 हजार 376 रुपयांची मागणी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केल्याचेही सांगितले जाते. आता किती शाळांत, किती विद्यार्थ्यांना अंडी दिली गेली, किंवा केळी दिली, याबाबत जिल्हा परिषद शालेय पोषण आहार प्रशासन कानाला हात लावताना दिसत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात झेडपी शाळांतील अंडीखरेदी हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button