Nagar News : पाण्यासाठी करोडीकरांचा बैठा सत्याग्रह! | पुढारी

Nagar News : पाण्यासाठी करोडीकरांचा बैठा सत्याग्रह!

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, करोडी गावात दुष्काळाच्या ठोस उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी करोडी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. मंगळवारपासून सत्याग्रह सुरू करण्यात आला असून, जोपर्यंत सरकार उपाययोजना करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे. या वेळी योगेश गोल्हार, उपसरपंच बाबूराव खेडकर, विठ्ठल खेडकर, कुंडलिक खेडकर, बाळासाहेब खेडकर, भगवान खेडकर, शहादेव खेडकर, दत्तू खेडकर, प्रकाश गिरी, गोरक्ष टाचतोडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोडी गावात भीषण दुष्काळ आहे. गावामध्ये मागील अनेक दिवसांपासून 2011च्या जनगणनेनुसार टँकरने पाणी येत आहे. परंतु आज लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन वाढीव टँकरची मागणी मागील एक महिन्यापासून करूनही आजपर्यंत टँकर उपलब्ध झालेला नाही. यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावामध्ये पशुधन व इतर प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची कोठेही सोय नसल्यामुळे त्यांचेही हाल होत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, रोहयोमधून दुष्काळ उपाययोजनेची कामे लवकरात लवकर वन विभागातर्फे उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

सध्या शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र पाथर्डी शाखेने शेतकर्‍यांना विविध कर्जाच्या गोष्टीत मुभा देऊन शेतकर्‍यांच्या खात्यात येणार्‍या सर्व योजनांचे पैसे शेतकरी खातेदारांना देऊन, कर्जवसुली थांबविण्यात यावी, या मागण्यांबाबत प्रशासनाने कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्यात यावे; अन्यथा हा बैठा सत्याग्रह येणार्‍या काळात तीव्र करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button