राजाश्रयाअभावी ‘करपल्लवी’ लुप्त होण्याच्या मार्गावर! | पुढारी

राजाश्रयाअभावी ‘करपल्लवी’ लुप्त होण्याच्या मार्गावर!

अमोल बी. गव्हाणे

श्रीगोंदा : एकमेकांशी संवाद साधणे ही एक कला आहे. त्या कलेला शब्दांची जोड असावी लागते. मात्र, शब्दही न बोलता केवळ बोटांनी हातवारे करून आपल्याकडील गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीला सांगण्याची कला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू आहे. मात्र, काळाच्या ओघात ही लोककला राजाश्रयाअभावी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी खंत करपल्लवी भाषा कलेच्या माध्यमातून सादर करणारे अमर शिंदे, भानुदास सावंत यांनी व्यक्त केली. मूळचे निंबोळी (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी असलेले अमर शिंदे, भानुदास सावंत, सुधाकर शिंदे हे तिघे गेल्या पंधरा दिवसांपासून आढळगाव भागात वास्तव्यास आहेत. करपल्लवी अर्थात करपावली ही भाषा शिवकाळापासून किंबहुना त्या अगोदरपासून प्रचलित आहे. शत्रूच्या गोटात जाऊन माहिती काढण्याचे काम त्याचबरोबर शत्रूसमोरच सहकार्‍याशी न बोलता हाताच्या हालचालीवरून करून निरोप पोहोचवण्याचे काम या भाषेतून होत असे. आता ही भाषा अवगत असणारे लोक फार कमी आहेत. हे लोक गावोगाव जाऊन तिथे या भाषेच्या माध्यमातून लोकांना माहिती देतात. त्यातून मिळणार्‍या रोख रक्कम अथवा धान्यरूपी वस्तूंतून यांची गुजराण होते.

करपल्लवी भाषा अवगत असणारे अमर शिंदे म्हणतात की, आम्हाला शेती नाही. त्यामुळे राज्यभर फिरून ही कला सादर करावी लागते. पण आता लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत. आमच्या कलेला राजाश्रय मिळत नाही. शिवकालीन भाषा जिवंत ठेवण्याचे काम आम्ही जरी करत असलो, तरी कुटुंबाची गुजराण करताना ओढाताण होते. या कलेवर आपला प्रपंच चालणार नाही, या जाणिवेतून आमची पुढची पिढी ही कला शिकायला तयार नाही. शिक्षण घेऊन वेगळे काही तरी करू हा त्यांचा पक्का निर्णय आम्हालाही मान्य करावा लागतो आहे.

आजही कुतूहल
करपल्लवी भाषा अवगत असलेले अमर शिंदे, भानुदास शिंदे, सुधाकर शिंदे हे ज्यावेळी आपली कला सादर करत होते त्या वेळी काहीही न बोलता समोरचा काय बोलतो आहे हे ओळखत होते. ही कला पाहून उपस्थित लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते.

हातवारे करून गुप्त माहिती सांगण्याची विशिष्ट कला
एकही शब्द न उच्चारता केवळ बोटांच्या हालचालींवरून आपल्याकडे असलेली गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीला सांगण्याची विशिष्ट कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गोंधळ्यांनी अवगत केली होती. या कलेला करपल्लवी किंवा काही भागात करपावली असे म्हणतात. ही कला अवगत असलेले गोंधळी आजही आहेत.

करपल्लवी टिकविण्याची जबाबदारी सर्वांची!
शिवकालीन ही सांकेतिक भाषा व तिचे महत्त्व टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा कला जोपासण्यासाठी राज्य सरकारने यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे, असे आढळगाव येथील नवनाथ शिंदे यांनी सांगितले.

शासकीय योजनांपासून वंचित!
आम्ही ही शिवकालीन भाषा कलेच्या माध्यमातून जपण्याचे काम करत आहोत. मात्र, राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेचा आम्हाला लाभ मिळत नाही. शासनाच्या उदासीनतेमुळे ही भाषा लोप पावणार आहे, असे भानुदास सावंत यांनी सांगितले.

Back to top button