Nagar : अखेर डिग्रसचा शासकीय वाळू डेपो सुरु | पुढारी

Nagar : अखेर डिग्रसचा शासकीय वाळू डेपो सुरु

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारागाव नांदूरसह डिग्रस हद्दीतील मुळा पात्रातील वाळू डेपो अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात महसूल व पोलिस प्रशासनास यश आले. दरम्यान, वाहतूक दरासह लगतच्या गावांमधील अंतर्गत रस्त्याचा कलह प्रशासन कसा संपवणार, याप्रश्नाकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. दै. पुढारीने, ‘शासकीय वाळू देता का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शासकीय वाळू डेपो सुरू केल्याने शेकडो ग्राहकांनी आभार मानले. राहुरी महसूल प्रशासनाने बारागाव नांदूर हद्दीत मुळा नदी पात्रामध्ये शासकीय वाळू डेपो सुरू केला होता.

काही दिवस डेपो सुरू नंतर तब्बल दीड महिना डेपो बंद ठेवला. बारागाव नांदूर व डिग्रस ग्रामस्थांना तब्बल 5 ते 6 हजार रुपये वाहतूक दर आकारला. दोन्ही गावातील अंतर्गत रस्त्यांचा वापर झाल्याने वाळू डेपोस्थळी खटके उडत होते. आ. प्राजक्त तनपुरे यांनी निर्माण होणार्‍या समस्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वाळू वाहतूक दरामध्ये मोठा बदल असल्याचे दिसले. शासनाच्या महा खनीज पोर्टलवर वाळू वाहतुकीस केवळ 31 ते 68 रुपये प्रति कि.मी. दर आकारावा, अशी माहिती होती. या प्रकाराबाबत आ. तनपुरे यांनी महसूल वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधूनही वाळू वाहतूक दराबाबत निश्चितता सांगितली जात नव्हती. वाळू ठेकेदार व लगतच्या ग्रामस्थांसह ग्राहकांमध्ये वाढलेले वाद पाहता शासकीय वाळू डेपो बंद झाला होता.

तब्बल दीड महिना वाळू डेपो बंद राहिल्याने दीड हजार वाळू ग्राहक त्रस्त झाले होते. शासकीय वाळू डेपोतून वाळू मिळविण्यासाठी महाखनीज पोर्टलवर किंवा लगतच्या सेतू कार्यालयातून नोदणी करावी लागते. नोंदणीनंतर शासकीय 600 रुपये ब्रास प्रमाणे रक्कम ऑनलाईन जमा करावी लागते. याबाबत राहुरी परिसरात शेकडो ग्राहकांनी शासकीय दरात वाळूसाठी ऑनलाईन नोंदणी करीत तब्बल 22 लाख रुपये अदा केले. यामुळे नोंदणी केलेल्या ग्राहकांना शासकीय वाळूची प्रतिक्षा होती. वाळू डेपो बंद पडूनही प्रशासन याकडे पुर्णतः दुर्लक्ष करीत होते. प्रशासनाने ग्राहक व ठेकेदारांचा समन्वय राखण्यासाठी बैठक घेत योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अखेर शासकीय वाळू डेपोबाबत दै. पुढारी वृत्तपत्राने ‘शासकीय वाळू देता का?,’ या मथळ्याखाली ग्राहकांच्या समस्या परखडपणे मांडल्या होत्या.

यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल व पोलिस प्रशासनाने थेट मुळा नदी पात्रात धाव घेत शासकीय वाळू डेपोची पहाणी केली. ठेकेदाराच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा शब्द दिला. आता शासकीय वाळू डेपोतून वाळू वाहतूक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वीपेक्षा वाळू वाहतुकीचा दर कमी केल्याची चर्चा आहे. कमी वाहतूक दरात वाळू पुरवठा होत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी शासकीय वाळू डेपोलगत होत आहे. दरम्यान, डिग्रस ग्रामस्थांच्या अंतर्गत रस्त्याबाबत समस्यांबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल. वाहतूक दर किंवा इतर समस्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याबाबत लवकरचं निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

तक्रारींचे निरसण करूः तहसीलदार पाटील
बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रातील शासकीय वाळू डेपो सुरू झाला. सुरळीतपणे वाळू पुरवठा होत आहे. कोणाची तक्रार आली नाही. वाळू वाहतूक दर किंवा इतर तक्रारी असल्यास तत्काळ निरसण करणार आहे, असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.

 

Back to top button