Crime News : मिठाई व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला | पुढारी

Crime News : मिठाई व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी यांच्यावर त्यांच्या घराजवळच (किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड) दोघांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर तलवार व पिस्तूल घटनास्थळी टाकून पसार झाले. या हल्ल्यात धीरज जोशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जोशी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की रामचंद्र खुंट येथे आमचे बन्सी महाराज मिठाईवाले नावाचे दुकान आहे. काल रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून कोठला स्टॅन्ड, डीएसपी चौक, तारापूर मिस्कीन मळा, तोफखाना पोलिस स्टेशन, प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम चौक या मार्गे घरी परतत होतो.

किर्लोस्कर कॉलनीतील घराजवळ गेलो तेव्हा माझी मुलगी घराबाहेर फिरत होती. तिच्याजवळ थांबलो असता अचानक पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मला शिवीगाळ करीत गचांडी पकडली आणि तलवारीने वार केले. आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक जमले. त्या वेळी हल्लेखोर हातातील तलवार आणि पिस्तूल तेथेच टाकून पळून गेले. माझ्या मुलींनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
धीरज जोशी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे चित्रीकर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये झाले आहे. आरोपी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आले होते व त्यांच्या अंगामध्ये जर्किन होते, असे त्यात दिसत आहे. हे फुटेज ताब्यात घेतले असून, तोफखाना पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

हल्लेखोरांकडे शस्त्रे येतात कुठून : आ.जगताप
मिठाई व्यावसायिक धीरज जोशी यांच्यावर हल्ला झाल्याचे समजतात आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून, डॉक्टरांशी चर्चा केली. आमदार जगताप म्हणाले, की गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. राजरोसपणे बंदूक आणि तलवारी घेऊन गुन्हेगार वावरतात. ही घातक शस्त्रे नेमकी येतात कुठून, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.

 

Back to top button