स्वच्छता गुन्हेगारांची.. स्वच्छता पोलिस ठाण्याची..! | पुढारी

स्वच्छता गुन्हेगारांची.. स्वच्छता पोलिस ठाण्याची..!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरासह तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी खमक्या पोलिस अधिकारी हवा, अशी मागणी होत होती. राहुरी ठाण्याचा कारभार हाती घेतलेले पो. नि. संजय ठेंगे यांनी पोलिसी खमक्या दाखविण्यास प्रारंभ केला आहे. गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळून आरोपींची धरपकड मोहीम हातीघेतल्याने गुन्हेगारांना धडकी भरली आहे. दरम्यान, गुन्हेगारांची ‘सफाई’ करतानाच ठेंगे यांनी पोलिस वसाहतीमध्ये वर्षानुवर्षे जमलेला कचरा, काटेरी झुडुपे हटवून आवार स्वच्छतेचा उपक्रमही लक्षवेधी ठरत आहे.

राहुरी पोलिस ठाणे हद्दीमध्ये सर्रास गुन्हेगारांचा वाढता प्रादुर्भाव त्रस्त करणारा ठरला होता. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस अधिकार्‍यांपुढे गुन्हेगारी कमी करावी की, गुन्हेगारांपुढे हुजरेगिरी करावी, अशी बिकट परिस्थिती दिसत होती. ऐकलं तर ठिक नाही तर कारवाई, असाच काहीसा प्रकार राहुरी हद्दीत जोमात सुरू झाल्याने राहुरीकरांना खमका अधिकारी लाभणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, यावर्षी संजय ठेंगे यांनी राहुरीचा कारभार हाती घेताच गुन्हेगारांची दहशत मोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. गुन्हेगारच नव्हे तर त्यांना साथ देणार्‍यांना कायद्याचा धाक समजला. गुन्हे दाखल आरोपींना पोलिस ठाणे ते न्यायालय असा बेड्या घालून पायी प्रवास करावा लागल्याने जनसामान्यांमध्ये कायद्याचा वचक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

एकिकडे गुन्हेगारांची स्वच्छता सुरू असतानाच पो. नि. ठेंगे यांनी पोलिस ठाणे आवारासह पोलिस वसाहत स्वच्छतेला प्राधान्य दिसले. पोलिस व महसूल इमारत इंग्रजकालिन असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली होती. महसूल व पोलिस ठाणे आवारात वाहनांची मोठी गर्दी होत होती. ताब्यात घेतलेली वाहने, गुन्ह्यातील साहित्य आवारातच पडून राहत होते. महसूलने पकडलेली वाळुची वाहने या आवारात उभी राहिल्याने सर्वसामान्यांना मोठी अडचण सहन करावी लागत होती. काही गुन्हेगारांसह पोलिस, महसूल आवारातील दलालांना पकडलेली वाहने तडजोडीस आडोसा ठरत होती. ही गोष्ट लक्षात घेता ठेंगे यांनी वाहने सुरक्षित स्थळी नेवून पोलिस व महसूल आवारातील कचर्‍याची विल्हेवाट लावल्याने आता सर्वसामान्यांची कुचंबना थांबली आहे.

2023 साल 4 पोलिस निरीक्षकांचे!
सन 2023 सालामध्ये राहुरी पोलिस ठाण्याला तब्बल 4 पोलिस निरीक्षक मिळाले, परंतू वाढता राजकीय हस्तक्षेप, गुन्हेगारीसह इतर कारणांवरून पोलिस निरीक्षकांची खुर्ची हालत राहिली, मात्र यंदा 2024 साली पोलिस निरीक्षक पदाची खुर्ची स्थीरावेल का, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button