Nagar : आश्वासनानंतरही वांबोरी चारीला पाणी नाहीच ! | पुढारी

Nagar : आश्वासनानंतरही वांबोरी चारीला पाणी नाहीच !

करंजी :  पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी तिसरा वीजपंप चालू करून दोन दिवसांत लाभधारक तलावांमध्ये पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिले. मात्र, तांत्रिक विभागाने बिअरिंग बसवण्याचे काम सुरू असल्याचे कारण पुढे करत गेल्या चार दिवसांपासून शेतकर्‍यांना वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. मुळा धरणातून पुढील दहा-पंधरा दिवस सर्व अडथळे दूर करून वांबोरी चारीला पाणी सोडले, तरच लाभधारक शेतकर्‍यांना या पाण्याचा काहीसा फायदा होणार आहे. जर या योजनेचा फुटबॉल उघडा पडला, तर यावर्षीचा वांबोरी चारीच्या पाण्याचा विषय कायमचा संपुष्टात येणार आहे. मुळा पाटबंधारे विभागातील तांत्रिकी विभागाच्या आडमुठेपणामुळे लाभधारक शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून, याला काही प्रमाणात पाटबंधारे विभागाचे अधिकारीदेखील जबाबदार राहणार आहेत. अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे वांबोरी चारी योजनेच्या लाभधारक शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.

करंजी येथे चार दिवसांपूर्वी लाभधारक शेतकर्‍यांनी आंदोलन करून मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्या वेळी दोन दिवसांत वांबोरी चारीचे पाणी लाभधारक तलावामध्ये पोहोचेल, असे आश्वासन मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बी. डी. पाटील यांनी दिले. मात्र, तांत्रिकी विभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी वीजपंपाच्या बिअरिंगचे काम सुरू असल्याचे सांगून निर्माण केलेला अडथळा आता शेतकर्‍यांच्या मुळावर येणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वांबोरी चारीचे तरी पाणी किमान शंभर दिवस लाभधारक शेतकर्‍यांना मिळेल अशी मोठी अपेक्षा लाभधारकांना होती. परंतु अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांना या पाण्यापासून आता वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. मुळा धरणातून डावा उजवा कालव्यासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे कोणत्याही क्षणी वांबोरी चारीचा मुळा धरणात असलेला फुटबॉल उघडा पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांचा या योजनेच्या पाण्यासाठी जीव टांगणीला लागला आहे. शेतकर्‍यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी देणे हे पुण्याचे कामदेखील मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी करू शकत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका असल्याचे सरपंच रफिक शेख, इलियास शेख, राजेंद्र पाठक, विलास टेमकर, विजय शिंदे, अशोक टेमकर यांनी सांगितले.

आ. तनपुरेंच्या सूचनांकडे डोळेझाक!

आ. प्राजक्त तनपुरे यांनी बिअरिंगसाठी लागणारा संपूर्ण खर्च स्वतः देण्यास तयार असल्याचे अधिकार्‍यांना सांगितले व कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लाभधारक तलावांत वांबोरी चारीचे पाणी सोडण्याचे काम करा, अशा सूचना दिल्या. परंतु संबंधित तांत्रिकी विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे डोळेझाक करत लाभधारक शेतकर्‍यांना या योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे.

Back to top button