Nagar : ग्रामसेवकाच्या संगनमताने 26 लाखांचा अपहार | पुढारी

Nagar : ग्रामसेवकाच्या संगनमताने 26 लाखांचा अपहार

वारी : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच रेणुका दत्तू दरेकर व ग्रामसेवक शिवाजी मगर यांनी 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या विकास कामात सुमारे 25 लाख 95 हजार रुपयांचा अपहार केला. कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कारवाई व पाठपुराव्यातून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सुनावणी झाली. साक्षी- पुराव्यांची बाजू समजून घेत रेणुका दरेकर यांना सदस्यपदास अपात्र ठरविण्यात आले. या निकालामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. धोंडेवाडी ग्रामपंचायतमध्ये फेब्रवारी 2021 मध्ये रेणुका दरेकर यांची सरपंचपदी निवड झाली होती. यानंतर ग्रामसेवक व सरपंचाच्या संयुक्त सह्यांचे धनादेश व आरटीजीएस प्रणालीद्वारे विकास काम न करता 14 व 15 व्या वित्त आयोगातील रकमेची परस्पर विल्हेवाट लाऊन अपहार केला.

कोपरगाव आयडीबीआय बँकेत 14 व्या वित्त आयोगाच्या खात्यातील 15.35 लाख 750 रक्कम काम न करता, कामाचे मुल्यांकन न करता खर्च केली. या बँकेतील 15 व्या वित्त आयोगातील रक्कम आयसीआयसीआय बँकेत वर्ग करून पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग करण्याच्या सूचना होत्या, मात्र ग्रामसेवकाने तसे न करता 4 .95 लाखाचा धनादेश व 5.65 लाख रुपये आरटीजीएसद्वारे अशी एकूण 10.60 लाख रुपये त्रयस्थ व्यक्ती बाबासाहेब शिंदे यांच्या कोकमठाण येथील महाराष्ट्र बँक शाखेत खात्यावर अनधिकृतपणे वर्ग केली.
दरम्यान ग. वि. अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत दप्तराची तपासणी केली असता आर्थिक व्यवहाराच्या नोंदी नसल्याचे आढळले. सूर्यवंशी यांनी दप्तर सील करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला होता. दरम्यान सदस्या रेणुका दरेकर, ग्रामसेवक शिवाजी मगरसह अपहारातील साथीदार कोकमठाण येथील बाबासाहेब रामभाऊ शिंदे याच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल ला आहे. ग्रामसेवक मगर व बाबसाहेब शिंदेकडून 12.68 लाख रुपये घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला. रेणुका दरेकर यांना ‘सर्वोच्च’मध्ये अटकपूर्व जामीन मंजुर झाला.

सरपंच पदाचा राजीनामा
ग्रामपंचायत निधीतील आर्थिक अपहाराप्रकरणी न्यायालयातील सुनावणी दरम्यान रेणुका दरेकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यावर प्रशासक तथा ग.वि. अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी राजीनामा मंजूर केला होता.

‘ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी सरकारद्वारे वित्त आयोगाच्या निधीचा दुरुपयोग अथवा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत. धोंडेवाडी अपहारप्रकरणी ग्रामपंचायत अभिलेखे तपासताना अपहार निदर्शनास येताच विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली होती.
            – सचिन सूर्यवंशी, प्रशासक तथा ग. वि. अधिकारी पं. स. कोपरगाव.

 

Back to top button