ओबीसी-मराठा वाद लावणे हाच छगन भुजबळांचा उद्योग | पुढारी

ओबीसी-मराठा वाद लावणे हाच छगन भुजबळांचा उद्योग

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यभरात अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रवर्गाची प्रमाणपत्रे असून, ते ओबीसी आरक्षणाचा लाभदेखील घेतात. या नेत्यांना विरोध करण्याची तसेच त्यांच्या विरोधात बोलण्याची धमक मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे का? केवळ गोरगरिब आणि गरजवंत मराठा समाजाला विरोध करून ते ओबीसी-मराठा समाजात वाद लावण्याचे उद्योग करीत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. मंत्री भुजबळ राज्य शासनाच्या पैशातून ओबीसी एल्गार मेळावे घेऊन मराठा समाजाचा द्वेष करीत भाषणे ठोकत फिरत आहेत. शनिवारी नगर येथे त्यांनी थेट मराठा समाजावर टीका केली. त्यामुळे नगर येथील सकल मराठा समाजाचे गोरख दळवी, गजेंद्र दांगट, राम जरांगे, परमेश्वर पाटील, शशिकांत भांबरे, स्वप्नील दगडे, मिलिंद जपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

नगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री भुजबळ यांच्यासह इतरांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. गावखेड्यातील बाराबलुतेदार समाज कालही आणि आजही मराठा समाजासोबत गुण्यागोविंदाने राहत असताना भुजबळ आणि त्यांनी जमा केलेले लोक गावागावांत केवळ दोन समाजात वाद लावण्याचे उद्योग करीत फिरत आहेत. असा आरोप सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला.

मराठा समाज आजच नव्हे तर पूर्वीपासूनच कुणबी प्रमाणपत्रे घेत आला आहे. मंत्री भुजबळ मेळाव्यातून केवळ ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र गरजवंत, गरीब मराठ्यांना विरोध करून मराठा समाजाला टार्गेट करत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जात, धर्माचा द्वेश करणार नाही, असे सांगणारे मंत्री भुजबळ संविधानाची भाषा बोलत नाहीत. त्यामुळे सरकाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भुजबळांनी घेतली आरक्षण संपवण्याची सुपारी
ओबीसीतील अनेक जातींनी आरक्षण असले तरी सरकारदरबारी ते मागास नाहीत हे सिद्ध झालेले आहे. मध्य प्रदेशात अशाच प्रकारातून ओबीसी आरक्षण गेले. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी मंत्री भुजबळ यांनी घेतली, असा आरोप या वेळी करण्यात आला.

.

Back to top button