खासदार संजय राऊत म्हणतात ; शिर्डी आमचीच, नगरसाठीही इच्छुक! | पुढारी

खासदार संजय राऊत म्हणतात ; शिर्डी आमचीच, नगरसाठीही इच्छुक!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहे. पूर्वी आम्ही तेवढ्याच जागा लढत होतो, आताही तेवढ्यात जागा लढवणार आहोत. नगर जिल्ह्यातील शिर्डी ही आमचीच आहे, संधी मिळाल्यास नगरची जागा लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.  खासदार राऊत नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व राजेंद्र दळवी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले, मराठा समाजातील अनेकजण आरक्षणाच्या अध्यादेशावरुन तोंडाला पाने पुसली, फसवणूक झाल्याची भाषा बोलत आहेत, परंतु हे मनोज जरांगे पाटील यांनी बोलणे आवश्यक आहे. त्यांचे समाधान झाले असेल तर आमचे काही म्हणणे नाही. ते तर समाधान झाले म्हणून मुख्यमंत्र्यांना मिठ्या मारत आहेत, अशी कोपरखिळी मारली. इंडिया आघाडीतून तृणमल काँग्रेस व आप बाहेर पडले, याकडे लक्ष वेधले असता खासदार राऊत म्हणाले, इंडिया आघाडी भक्कम आहे. कोणीही आघाडीतून बाहेर जात नाही. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्रच आहेत. पंजाबमध्ये थोडी वेगळी परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती पश्चिम बंगाल व केरळमध्ये आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत आहे, कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरही चर्चेत सहभागी होत आहेत.
त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जी काही जिरवाजीरवी करायची आहे ती निवडणुकीनंतर पुढील काळात करावी, सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

भुजबळ स्वाभीमानी; राजीनामा देवून बाहेर पडा!
मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून छगन भुजबळ खरोखरच अस्वस्थ झाले असतील तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे. ते पूर्वाश्रमीची शिवसैनिक आहेत. त्यांनी स्वाभिमान दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरुद्ध दहा मंत्री दहातोंडाने बोलत आहेत, सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नसल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली.

Back to top button