नगर जिल्ह्यासाठी उरणार फक्त 38 टीएमसी पाणीसाठा | पुढारी

नगर जिल्ह्यासाठी उरणार फक्त 38 टीएमसी पाणीसाठा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील धरणांत शुक्रवारी सकाळी 43 हजार 646 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध होता. शुक्रवारी रात्री निळवंडे धरणातून, तर रविवारी दुपारी मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. या धरणांतून जवळपास साडेपाच टीएमसी पाणी जाणार आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत जिल्ह्यात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी फक्त 38 हजार 145 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक असणार आहे. हा पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे मुळा व भंडारदरा धरणाचे शेतीसाठी प्रत्येकी एक आवर्तन कमी होणार आहे. यंदा पावसाबरोबरच धरणांतील पाण्याचा फटका बसल्यामुळे रब्बी पिकेदेखील हाती लागणे मुश्कील झाले आहे. जिल्ह्यात भंडारदरा, मुळा, निळवंडे ही तीन मोठी आणि आढळा, सीना, मांडओहळ, खैरी, विसापूर ही छोटी धरणे आहेत. या मध्यम व मोठ्या धरणांची पाणीसाठवण क्षमता 51 हजार 479 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मुबलक पाऊस झाल्यास ही सर्वच धरणे ओव्हर-फ्लो होतात. त्यामुळे खरिपाबरोबरच रब्बी पिकांचे उत्पादन चांगले होते.

यंदा मात्र पावसाने गुंगारा दिला. त्यामुळे कशी तरी 90 टक्के पावसाची नोंद झाली. यंदा साडेतीन महिने ओढे-नाले वाहिलेच नाहीत. त्यामुळे नद्याही वाहताना दिसल्या नाहीत. दमदार पावसाअभावी गावपातळीवरील तलावसुद्धा भरले नाहीत. परिणामी यंदा भूजलपातळी कमालीची खालावणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाणीटंचाईचे सावट सर्वत्र असणार आहे.

मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे भंडारदरा, निळवंडे आणि आढळा धरणे ओव्हर-फ्लो झाली. मुळा धरण मात्र 91 टक्केच भरले. या धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस झाला नसला, तरी धरणांच्या पाण्यातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी नेहमीप्रमाणे आवर्तने होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, जायकवाडी धरण मानगुटीवर बसले. यंदा हे धरण 65 टक्क्यांपेक्षा कमी भरले. त्यामुळे जिल्हाभरातील पाणी जाणार अशी भीती होती. जायकवाडी धरणात साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडीला 8.603 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यात मुळा धरणातून 2.10 तर भंडारदा- निळवंडेतून 3.36 टीएमसी असे एकूण 5.46 टीएमसी पाणीसाठी कमी होणार आहे. त्यामुळे यंदा जिल्हाभरात 38 हजार 145 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असणार आहे. साडेपाच टीएमसी पाणीसाठा कमी झाल्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्रतेने भासणार आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पिकांवरदेखील सक्रांत येणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.5 टीएमसी पाणी कमी
गेल्या वर्षी सर्वच धरणे ओव्हर-फ्लो झाली होती. या धरणांच्या लाभक्षेत्रातदेखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्हाभरात पाणीच पाणी होते. जायकवाडी 65 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने तिकडे पाणी सोडण्याचे कामच नव्हते. त्यामुळे धरणांतील पाणी जिल्हाभरातच खेळवले गेले. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्हाभरात 51 हजार 3422 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. अशा परिस्थितीत साडेेपाच टीएमसी पाणी जायकवाडीला सोडावे लागले आहे.

धरणांतील शुक्रवारचा पाणीसाठा (दलघफू)
मुळा : 22833, भंडारदरा : 9294, निळवंडे : 8117, आढळा : 1020, मांडओहळ : 81.81, घाटगाव : 7.00, सीना : 1502, खैरी : 100, विसापूर : 492, मुसळवाडी 50.12, टाकळीभान 149.

हेही वाचा :

Back to top button