शहरातील शौचालयांची दुरवस्था व कुलूपबंद, नगरकरांची चेष्टा | पुढारी

शहरातील शौचालयांची दुरवस्था व कुलूपबंद, नगरकरांची चेष्टा

सूर्यकांत वरकड

नगर : महापालिकेला शहर सौंदर्यीकरणामध्ये केंद्र व राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. तरीही शहरातील शौचालयांचा उद्धार झाला नाही. बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय नाही. तर, प्रोफेसर कॉलनी चौकातील शौचालय कुलूपबंद आहे. मनपाकडून शौचालयासाठी चार लाखांचा निधी परत केल्याचा प्रकार ताजा असताना शहरातील शौचालयांची दुरवस्था व कुलूपबंद असेल, तर ही नगरकरांची चेष्टा म्हणावी लागेल, अशी चर्चा आहे. महापालिकेच्या हद्दीत सुमारे वीस ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सोय आहे.

परंतु, बोटावर मोजण्याइतकी शौचालये वगळली तर इतर शौचालयांची दुरवस्था आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवीन शौचालयांसाठी सुमारे चार कोटींचा निधी आला होता. परंतु, केवळ मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तो निधी परत गेला. त्या निधीमधून शहरात अनेक ठिकाणी सुसज्ज शौचालये उभारता आली असती. शहरात कापड बाजार ही मोठी बाजारपेठ आहे. परंतु, बाजारपेठेत महिलांसाठी शौचालयासाठी चांगली व्यवस्था नाही. महात्मा फुले भाजी मंडईमध्ये शौचालये आहेत. परंतु, त्यांची दुरवस्था पाहून तिथे कोणीही जात नाही. त्यामुळे बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. शहरातील माणिक चौक, जुनी महापालिका, पोलिस मुख्यालय, मार्केट यार्ड परिसरातील शौचालये सुस्थितीत सुरू आहेत. मात्र, अन्य शौचालयांची दुरवस्था आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील नव्याने बांधलेले शौचालय बंद असून, त्याला कुलूप लावले आहे. लाखोंचा निधी येऊन शहरात शौचालयांची व्यवस्था नाही. प्रोफेसर कॉलनी चौकातील शौचालयाला कुलूप लावणे म्हणजे ही नगरकरांची चेष्टाच आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

सौंदर्यीकरणाच्या निधीतून शौचालये उभारावीत
शहरात विविध भागात महिलांसाठी शौचालये असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने शहर सौंदर्यीकरणाच्या निधीतून महिलांसाठी सार्वजनिक शौचालये उभारावीत, अशी मागणी नगरकरांमधून होऊ लागली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button