सिनेस्टाईल थरारनाट्य : पोहत पाठलाग करून दारू विक्रेत्याला पकडले | पुढारी

सिनेस्टाईल थरारनाट्य : पोहत पाठलाग करून दारू विक्रेत्याला पकडले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथील खडकवासला धरणतीरावर बेकायदा गावठी दारू विक्री धंद्यावर वेल्हे पोलिसांनी धाड टाकली. त्या वेळी मुद्देमाल जागेवर सोडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उडी मारून पलायन करणार्‍या सराईत दारू विक्रेत्याला पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांनी अंगावरील कपड्यांनिशी पोहत पाठलाग करून जेरबंद केले.
तब्बल अर्धा-पाऊण तास रंगलेले थरारनाट्य पाहून परिसरातील नागरिक अचंबित झाले. पडळकर यांच्या साहसी कामगिरीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. अभिमन्यू ईश्वर नानावत (रा. ओसाडे, ता. राजगड) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ओसाडे येथील धरणतीरावर राजरोसपणे बेकायदा दारू विक्री करणार्‍या दारू धंद्यावर वेल्हे पोलिसांनी शनिवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धाड टाकली. पोलिस आल्याची माहिती मिळताच नानावत याने खडकवासला धरणाच्या पाणलोटात उडी मारली. तो धरणात पोहत पलीकडील सांगरुण गावच्या तीराकडे पळून चालला होता. त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता पडळकर यांनी अंगावरील कपड्यांसह धरणात उडी मारली. वेगाने पोहून पाठलाग करीत नानावत यास धरणाच्या मध्यभागीच जेरबंद केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू धंद्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी ओसाडे येथे धरणतीरावर आडबाजूला राजरोसपणे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पडळकर, सहाय्यक फौजदार राजाराम होले, पोलिस हवालदार पंकज मोघे, मयूर जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button