सांगली : नेलकरंजीत एसटीच्या चाकाखाली सापडून दोन महिन्याचे बाळ जागीच ठार; देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबावर शोककळा | पुढारी

सांगली : नेलकरंजीत एसटीच्या चाकाखाली सापडून दोन महिन्याचे बाळ जागीच ठार; देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबावर शोककळा

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : नेलकरंजी (ता.आटपाडी) येथे मोटारसायकल व एसटी बसच्या अपघातात हर्ष अनिल माने या दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.

याबाबात अधिक माहिती अशी की, आटपाडी आगाराची सांगलीहून आटपाडीकडे जाणारी बस क्रमांक (एम.एच. २९ डी.टी. ३८६९)नेलकरंजी बसस्थानकाजवळ आटपाडीकडे वळण घेत होती. तर मोटारसायकलवरून (क्रमांक एम.एच.११ बी.ई. ८१३) अनिल परशू माने (वय २३ रा.म्हसवड, ता.माण जिल्हा सातारा) हे म्हसवडकडे निघाले होते. पत्नी आणि दोन महिन्यांचे बाळ हर्ष आणि मुलगी आराध्या त्यांच्या सोबत होते.

इंडिकेटर न दाखवता बसने वळण घेतल्याने दुर्घटना

एसटीच्या चालकाने इंडिकेटर न दाखवता उजव्या बाजूस बस वळविली त्यामुळे एस.टी.च्या बंपरला मोटारसायकल घासली गेली. या घटनेत दोन महिन्याचे बाळ एसटीच्या उजव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले.

देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला

अनिल माने मूळ गाव तासगावचे आहेत. आपल्या कुटुंबासमवेत म्हसवड येथे राहत आहेत. भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करणारे अनिल आपल्या मूळगावी देवदर्शनासाठी सहकुटुंब आले होते. देवदर्शन करून खरसुंडी मार्गे म्हसवडकडे जाताना हा अपघात झाला. दोन महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत होती.

Back to top button