Gobardhan project : नगर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प लोणीत ! | पुढारी

Gobardhan project : नगर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प लोणीत !

नगर : पुढारी वृत्तसेवा : साई चरणी अर्पण केलेल्या निर्माल्याचा पुनर्वापर करून त्याव्दारे लोणीत अष्टगंध, अगरबत्ती निर्मिती सुरू झाल्याचे देशाने पाहिले आहे. आता याच लोणीत गावातील कचर्‍यापासून बायोगॅस उत्पादन करणारा जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प पूर्ण झाला असून, यातून स्वयंपाकासाठी बायोगॅस, तसेच सेंद्रीय खताचीही निर्मिती शक्य होणार आहे. लोणी ही मोठी बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालये, खानावळी, हॉटेल्सची संख्याही लक्षणीय आहे.

त्यामुळे या ठिकाणचा कचर्‍याची विल्हेवाट लावून नागरिकांचे आरोग्याची काळजी घेतानाच त्या कचर्‍याचाही पुनर्वापर करण्यासाठी शालिनीताई विखे पाटील यांनी 2004 पासून गोबरधन प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. पुढे जिल्हा परिषदेत अध्यक्ष असतानाही त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी आतापर्यंत प्रशासनाचा पाठपुरावा सोडला नव्हता. त्यांच्याच मार्गदर्शनात गटविकास अधिकारी म्हणून समर्थ शेवाळे हे कार्यरत असताना त्यांनी या प्रकल्पाला गती दिली आणि आज राज्यासाठी दिशादर्शक ठरणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने स्वच्छ भारत ग्रामीण अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या गोबरधन प्रकल्पाचे उद्घाटन लोणी येथे शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, बीडीओ जालिंदर पठारे, सरपंच लोणी बु. कल्पनाताई मैड, कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे, उपअभियंता धापटकर, शाखा अभियंता वाघमारे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाचे काम करण्यात आले

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद यांनी लोणी गावात निर्माण होणार्‍या महानगरपालिका घनकचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प आखला. ज्यामुळे गावातील एकूण स्वच्छता आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करता येईल. सोबतच बायोगॅसचा देखील स्वयंपाकासाठी वापर करता येईल. या प्रकल्पाची क्षमता 2 मे. टन प्रति दिन असून यातून बायोगॅसची निर्मिति 100-120 घन मी. प्रति दिवस होणार आहे.

शालिनीताई विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर आणि सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात लोणीत आज हा प्रकल्प उभा राहिला आहे. गावातील संकलित केलेला ओला-सुका कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाईल. यातून बायोगॅसची निर्मिती होईल.
                                         – समर्थ शेवाळे, प्रकल्प संचालक, स्वच्छता मिशन

ग्रामपंचायत करणार कचर्‍याचे संकलन
लोणी ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व घरातील, खानावळीतील, हॉटेल्समधील टाकाऊ अन्न तसेच बाजार संपल्यानंतर अस्ताव्यस्त विखुरलेली फळे व भाजीपाला ही ग्रामपंचायतींच्या वतीने जमा केली जाईल. हा विलगीकरण केलेला सेंद्रिय ओला कचरा, पाळीव जनावरांचे शेण या प्रकल्पासाठी वापरले जाईल. यातून तयार होणारा बायोगॅस हा घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणार आहे. तसेच या घटकाचा खत म्हणूनही वापर होणार आहे.

Back to top button