Nagar news : अखेर टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने टँकर बंद! | पुढारी

Nagar news : अखेर टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने टँकर बंद!

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या साडे तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. दुष्काळात तालुक्यात 42 टँकरने पाणी पुरवठा केला जात होता, मात्र टंचाई आराखड्याची मुदत (30 सप्टेंबर) रोजी संपल्याने रविवार (दि. 1 ऑक्टोबर ) पासून सर्व टँकर बंद करण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी अनिल नेमाणे यांनी दिली.
दरवर्षी एप्रिल महिन्यात टंचाई आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी घेण्यात येते. सुरुवातीला जुनपर्यंत यास मंजुरी होती, मात्र पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे टंचाई आराखड्याची मुदत सप्टेंबरअखेर वाढविली होती. काही भागात पावसाने हजेरी लावली. पाणी उपलब्ध झाल्याने 27 सप्टेंबर रोजी यातील 6 गावे 9 वाड्यांना पाणी पुरवठा करणारे 4 टँकर बंद करण्यात आले होते. आता टंचाई आराखड्याची मुदतच 30 सप्टेंबरला संपली. परिणामी रविवारपासून संगमनेर तालुक्यात सुरु असलेले सर्व टँकर नियमाने बंद झाले. सध्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पाणी उपलब्ध झाले. काही गावांनी टँकर बंद करण्याचे प्रस्ताव सादर केले. यामुळे चार टँकर बंद करण्यात आले. ज्या गावात दुष्काळी परिस्थिती आहे, त्या गावांना टँकर पाहिजे असल्यास नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. सध्या कुठल्याही प्रकारचे टँकर सुरू राहणार नाही, असे सांगण्यात आले.

पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती बदलून पाणी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीकडून आलेल्या मागणीनुसार पंचायत समिती टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकार्‍याना सादर करते. गट विकास अधिकारी व इतर अधिकारी याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

13 टँकरने पुरविले संगमनेर तालुक्याला पाणी!
संगमनेर तालुक्यातील 17 गावे 10 गावठाण व 42 वाड्यांना 13 टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यात 9 शासकीय तर 3 खासगी टँकरचा समावेश होता, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button