बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निषेध | पुढारी

बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निषेध

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ‘लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीपर्यंत भाजपच्या विरोधात कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये, यासाठी पत्रकारांना चहापाण्याला बोलवा, ढाब्यावर घेऊन जा,’ अशा आशयाचे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नगरसह राज्यभरातून पत्रकार आणि राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. भाजप पदाधिकार्‍यांचे खुलासा करताना नाकीनऊ आले.
बावनकुळे रविवारी (दि. 25) नगरच्या दौर्‍यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत वरील वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. मॅनेज होणारे पत्रकार नगरमध्ये नाहीत, मात्र असे वक्तव्य करून बावनकुळे यांनी पत्रकारांचा अपमान केला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

आमदार रोहित पवार यांनी बावनकुळे यांचा निषेध करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात म्हटले आहे, ‘ज्याप्रमाणे दिल्लीतले पत्रकार तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतात, त्याप्रमाणे महाराष्ट्रातले पत्रकारही तुमच्या दबावाला, प्रलोभनांना बळी पडून तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतील हा तुमचा समज असेल, तर मग तुम्हाला अजून महाराष्ट्र कळलेला दिसत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच दिल्लीसमोर झुकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका मला पूर्णतः चुकीची वाटते.’

बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत भाजपने पत्रकारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची भूमिका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी मांडली आहे.

‘पत्रकारांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी बोललो’
भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने बोललो होतो आणि त्यात गैर काही नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात असून, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button