पिंपरी(पुणे) : हेम्लेट घरीच ठेवून बाहेर निघालात, तर सावधान! सात महिन्यांत चार हजार विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारत त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. उपप्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन 2022 ते 2023 या वर्षात घडलेल्या अपघातांची आकडेवारी पाहता, यामध्ये दुचाकीस्वार आणि पादचार्यांची संख्या अधिक आहे. एकूण अपघातांपैकी 80 टक्के अपघात दुचाकी स्वार आणि पादचार्यांचे घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरटीओच्या वतीने विविध खासगी कार्यालये, शाळा, कॉलेज तसेच विविध शासकीय आस्थापनांमध्ये हेल्मेट वापराविषयी प्रबोधनात्मक नोटीस देण्यात आल्या. तसेच विविध ठिकाणी याविषयी प्रबोधनात्मक सत्र घेण्यात आली. या माध्यमातून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे. हे विविध उदाहरणे तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून समजावण्यात आले.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपी, लोकल, मेट्रो आदी सक्षम होणे आवश्यक आहे. यामुळे नागरिक खासगी वाहतुकीचा वापर करणे टाळतील. मात्र ही व्यवस्था अक्षम असल्याने पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराची सर्वाधिक दुचाकी असलेले शहर म्हणून नव्याने ओळख निर्माण झाली आहे.
यामुळे प्रदूषणात अधिक भर पडत असून, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परिणामी कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने वाहने अधिक वेगाने पळविली जातात, यामुळे अपघाताचा सामना करावा लागत आहे. याउट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली गेली तर खासगी वाहने रस्त्यावर धावणार नाहीत. परिणामी वाहतूक कोंडीसह शहराचे होणारे प्रदूषणदेखील रोखले जाईल. त्यामुळे अपघातांची संख्या घटणार आहे.
मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणार्या अथवा त्यास संमती देणार्या व्यक्तीस दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.
जुलै महिन्यात विनाहेल्मेट प्रवास करणार्या एकूण 1486 दुचाकीस्वारांवर आरटीओच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली असून, सर्वांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
अपघाताला बळी पडणारा वर्ग (वयोगट)
विनाहेल्मेट – 20 ते 35 वयोगट
पादचारी – 50 ते 60
शहरातील रस्ते अपघातात दुचाकीस्वार व पादचार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये 70 ते 80 टक्के अपघात हे केवळ दुचाकीस्वार आणि पादचार्यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना हेल्मेट परिधान करूनच निघा.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
पिं. चिं. शहर.
हेही वाचा