इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची आदिवासी पारधी महासंघाची मागणी | पुढारी

इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची आदिवासी पारधी महासंघाची मागणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणतात. आधुनिक युगात ग्रामीण आणि शहरी सर्व समाजांना अगदी इंग्रजी शिक्षणही सहज उपलब्ध झाले आहे. मात्र आधीच शिक्षणाच्या दारात आता आता पोहोचलेल्या आदिवासी पारधी समाजातील मुलांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत समाजातूनच व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात आदिवासी पारधी समाजाची लोकसंख्या अधिक आहे, त्या तालुक्यात राजूर येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची मागणी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी योजनांची माहिती उपलब्ध करावी, अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली आहे. इतिहासाने कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी समाजातील अनेक जण शिक्षणाची वाट चोखाळत आहेत, ही समाधानकारक बाब असतानाच आता हे वाघिणीचे दूध सपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी या महासंघाने कंबर कसल्याचे मानले जात आहे.

महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेत त्यांना तसे साकडे घातले. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांत आदिवासी पारधी समाजाची लोकसंख्या अधिक आहे, तेथे राजूर येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी. समाजातील लोक शेतमजूर तसेच शेळी, मेंढी, गाय, म्हैस पालन करीत दूध व्यवसाय करू शकतात. त्यामुळे या समाजास दुधाळ जनावरे व शेळ्या, मेंढ्या पालनासारख्या योजना राबवून पशुधनाचे वाटप करण्यात यावे. इतर समाजांना पंचायत समितीमार्फत योजनांचे वाटप होते. मात्र, आदिवासी पारधी समाजासाठी मात्र आदिवासी विकास विभागाकडे बोट दाखविले जाते. आदिवासी समाजाकडे जातीचे दाखले नाहीत.

दाखले काढण्यासाठी 1950 चा पुरावा मागितला जात आहे. परंतु समाजच अनिवासी आहे. त्यामुळे पुरावे कोठून उपलब्ध करावेत, असा सवाल त्यात उपस्थित केला आहे. आदिवासी पारधी समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले उपलब्ध करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मुले शिष्यवृत्तीपासून वंचित असून, लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी, असेही साकडे यावेळी घातले. आदिवासी पारधी महासंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब साळुंके, जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे, संघटक चिराजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस ईश्वर भोसले, शिवहरी काळे, संतोष पिंपळे, दादा पवार, प्रवीण काळे, किरण भोसले आदी उपस्थित होते.

 

Back to top button