एमआयडीसीचा प्रश्न मीच सोडविणार : आमदार राम शिंदे | पुढारी

एमआयडीसीचा प्रश्न मीच सोडविणार : आमदार राम शिंदे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जतमध्ये एमआयडीसी होण्यासाठी यापूर्वी आपणच पुढाकार घेतला होता. पाठपुरावा सुरू केला होता. आता या मुद्द्यावरून राजकारण ढवळून निघाले आहे. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही. एमआयडीसीचा प्रश्न मीच मार्गी लावणार आहे. मतदारसंघातील तरूणांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आमदार प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.
कर्जत एमआयडीसी मुद्द्यावरून आमदार शिंदे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सन 2015-16 ला मीच कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. आता त्याचा शेवट सुद्धा मीच करणार आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत एमआयडीसीचा प्रश्न मीच मार्गी लावणार, त्यामुळे कोणीही संभ्रम बाळगू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

एमआयडीसीच्या जागा निश्चितीबद्दल मेमोरंटम किंवा प्रोसिजर उद्योग विभागाकडे आहे, ते उद्योगमंत्र्यांनी सभागृहात वाचून दाखविले. आमदार रोहित पवार यांनी प्रस्तावित केलेली जागा निरव मोदी व त्यांच्या मित्रांची आहे. ही जागा एमआयडीसीसाठी भूसंपादित करण्याचा घाट आमदार पवार यांनी घातला आहे. म्हणूनच याच जागेवर एमआयडीसी होण्यासाठी ते हट्ट धरत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला.

उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, जागा सलग पाहिजे, खड्डे व उंचावर नसली पाहिजे. तिथे पाण्याची, विजेची, रस्त्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्यांचा अभाव या जागेत आहे. निरव मोदी, अग्रवाल, छेडा, शहा विनोद खन्ना अशा जमिनी तिथे आहेत. नकाशामध्ये कुठेही सुसूत्रता नाही. त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये किंवा जवळ ही जागा येते. त्यामुळे पाटेगावच्या गावकर्‍यांनी विशेष ग्रामसभा घेत याठिकाणी एमआयडीसीला विरोध केला. रोहित पवारांनी हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखाना विकत घेतल्याबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढून टाकले. युवकांना रोजगार देण्याची भाषा ते करतात, मग हे स्थानिक लोक कामावरून का काढून टाकले?

असा सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केला. शिंदे म्हणाले, मतदारसंघातील जनता आता त्यांच्या भूलथापांना फसणार नाही. कर्जत एमआयडीसी मुद्द्यावर कुठे पाहिजे तिथे चर्चा करायची माझी तयारी आहे, असे जाहीर आव्हानही आमदार शिंदे यांनी दिले. निरव मोदीसारख्या दलालांनी कवडीमोल किमतीने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या जमिनींचा मावेजा मिळवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याची टीका आमदार शिंदे यांनी आमदार पवारांवर केली.

आमदार पवार यांना गर्भित इशारा
माझी वडिलोपार्जित जमीन सोडून कर्जत व जामखेडमध्ये माझ्या नावावर एक गुंठा जरी जमीन असेल तर ती सरकारकडे जमा करायला मी तयार आहे. पण, तुम्ही आणि तुमच्या बगलबच्चांनी तीन वर्षांत किती जमिनी घेतल्या, त्या सरकारला देणार का? आम्ही दीड-दोन हजार स्क्वेअर फूट जागेत घर बांधले, तर 2019 ला तुम्ही केवढी चर्चा केली. आता तुम्ही दोन एकर जागेत अर्धा एकराचे घर बांधलेय, ते पण सांगितले पाहिजे ना? केवढं घर बांधलयं, हेही बाहेर काढावे लागेल, असा गर्भित इशारा यावेळी आमदार शिंदे यांनी दिला.

Back to top button