अडतीस कोटींच्या कामांची स्थगिती उठविली : आमदार नीलेश लंके | पुढारी

अडतीस कोटींच्या कामांची स्थगिती उठविली : आमदार नीलेश लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारनेर-नगर मतदारसंघातील मंजुर करण्यात आलेल्या 38 कोटी 6 लाख 85 हजार रूपये खर्चाच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान, दलित वस्ती सुधार योजनेतील 1 कोटी रूपये खर्चाच्या कामांचा मार्गही मोकळा झाला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. शिवसेनेत फूट पडून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर, सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांना मोठ्या प्रमाणावर स्थगिती दिली होती. बजेट बुकमध्ये कामांची नोंद झाल्यानंतर कामांना स्थगिती देता येत नसतानाही, त्यावेळी ही कामे रोखण्यात आली होती.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. अर्थ खात्याची जबाबदारीही पवारांकडे आल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या सर्व कामांची स्थगिती उठविण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळेे ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थगिती उठविलेली कामे व निधी
पानोली ते गटेवाडी 3 कोटी 75 लाख, जामगाव ते भाळवणी व जामगाव ते पारनेर 2 कोटी 32 लाख 75 हजार, गोरेगाव ते किन्ही, कान्हूर 2 कोटी 35 लाख 60 हजार, गोरेगाव ते किन्ही घाट 2 कोटी 32 लाख 75 हजार, एमआयडीसी ते बाबुर्डी, बाबुर्डी ते विसापूर तालुका हद्द 3 कोटी 61 लाख , रांजणगाव मशिद ते घोडकेवाडी 2 कोटी 32 लाख 75 हजार, रांजणगाव मशिद ते भोयरे गांगर्डा 6 कोटी 65 लाख, भाळवणी ते खारेकर्जुने 2 कोटी, अस्तगाव ते सारोळा तालुका हद्द 2 कोटी 48 लाख, मुळा नदी पूल ते मांडवा, वडगाव सावताळ ते वासुंदे पेट्रोल पंप, टाकळी ढोकेश्वर ते कान्हूर रस्ता 2 कोटी 49 लाख, सोबलेवाडी ते पारनेर, पारनेर पानोली चौक ते पानोली घाट 6 कोटी 50 लाख, राज्य मार्ग 61 ते ढवळपुरी ते जांभळी फाटा 5 कोटी.

दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत बाबुर्डी घुमट येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 2 लाख, जखणगांव येथील मागासवर्गीय वस्तीअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 15 लाख, नांदगाव येथील लोहार वस्ती ते जाधव वस्ती रस्ता काँक्रिटीकरण 15 लाख, वाडेगव्हाण येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख, पळशी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉ. बााबसाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख, सावरगाव येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये समाजिक सभागृह बांधणे 15 लाख.

‘पर्यटन’चे 10 कोटीही उपलब्ध होणार
पर्यटन खात्याकडे 10 कोटींच्या कामांची मागणी करण्यात आल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निधीलाही शिंदे-फडवणीस सरकाकडून स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगितीही उठविण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

महिन्यात 73 कोटींचा निधी
अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये पारनेर-नगर मतदारसंघासाठी 29 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. दलितवस्ती सुधार योजनेचे 1 कोटी, 39 कोटी 6 लाख 85 हजार रूपयांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली. पारनेर नगरपंचायतीच्या 5 कोटी रूपयांच्या कामांवरील स्थगितीही उठविण्यात आल्याने महिनाभरात एकूण 73 कोटींचा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा :

Nitin Chandrakant Desai : बॉलीवूडला कलेचा नवा दृष्‍टीकोन देणारे कला दिग्‍दर्शक नितीन चंद्रकांत देसाई

अधिक श्रावणातील शिवदर्शन : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नगरेश्वर मंदिर

Back to top button