अहमदनगर : मिशन आपुलकीत शिक्षक बँकही पुढे.! | पुढारी

अहमदनगर : मिशन आपुलकीत शिक्षक बँकही पुढे.!

अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने मिशन आपुलकी अंतर्गत शिक्षक बँकेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव बोर्ड वाटपाचा जो निर्णय घेतला आहे, तो स्तुत्य असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचा ओढा मराठी शाळेकडे वाढला आहे, हि निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपलेखा अधिकारी रमेश कासार, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा कुलट, शिक्षक बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, व्हा. चेअरमन कैलास सारोक्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

संभाजीराव लांगोरे म्हणाले की, जिल्ह्यातील जवळपास एक हजार शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिशन आपुलकीतून प्राप्त झाला आहे. जवळपास लोक सहभागातून जिल्हा परिषदेतील शाळांनी 21 कोटीच्या आसपास निधी जमा केला. यावरूनच शिक्षकांप्रती समाजात असलेले आदराची भावना आणि शैक्षणिक दर्जा यामुळेच ही एवढी मोठी वर्गणी जमा झाली.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, शिक्षक बँकेने ठरल्याप्रमाणे शब्द पाळून 28 प्राथमिक शाळांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड देऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळे स्कॉलरशिप परीक्षेत अहमदनगर जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पुढे जातात. यापुढे शिक्षकांना दैनंदिन माहिती देण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

पद्वारेच महिन्यातून एकदाच माहिती अपडेट केली की पुन्हा वारंवार माहिती द्यावी लागणार नाही. त्यामुळे शिक्षकांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सूचनेप्रमाणे सेस फंडातून इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटपाचा संकल्प केला. त्याची परिपूर्ती करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. शिक्षकांना जास्तीत जास्त ज्ञानदानासाठी वेळ मिळाला पाहिजे , त्यांच्याकडील अतिरिक्त कामे कमी झाली पाहिजेत.

यासाठी आपल्या जिल्हा परिषदेने आपल्या जिल्ह्यामध्ये उपक्रम सुरू करून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच माहिती जर संकलित केली, तर शिक्षकांना तीच ती माहिती वारंवार द्यावी लागणार नाही. एवढ्या मोठ्या अडचणीवर मात करून अहमदनगर जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक यांनी शाळेचा कायापालट केला असून शाळेच्या गुणवत्तेमध्ये राज्यांमध्ये एक आगळावेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रास्ताविक डॉ. संदीप मोटे यांनी करून शिक्षक बँकेचा लेखाजोखा सभागृहासमोर मांडला. यावेळी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले व एरंडोली शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर, संतोष दुसुंगे, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, आर. टी. साबळे, आबासाहेब दळवी, बाळासाहेब कदम, शरद वांडेकर, मुकेश गडदे, राजेंद्र निमसे, रमेश दरेकर, संभाजी आढाव,शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव रहिंज, बाळासाहेब सरोदे, शशिकांत जेजुरकर, बाळासाहेब कापसे, ज्ञानेश्वर शिरसाठ, रमेश गोरे कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, योगेश वाघमारे, महेश भनभने, संतोष राऊत, बाळासाहेब तापकीर, सूर्यकांत काळे, कारभारी बाबर, कैलास सहाने, माणिक कदम, रामेश्वर चोपडे, अण्णासाहेब आभाळे,सचिन नाबगे, संदीप मेहेत्रे, निवृत्ती धुमाळ, रविकिरण साळवे, बाबासाहेब दिघे, विठ्ठल काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी केले तर आभार संचालक भाऊराव राहिंज यांनी मानले.यावेळी 28 शाळातील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सरपंच आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button