वाळकी : व्याज सवलत रकमेत मोठे गौडबंगाल; जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | पुढारी

वाळकी : व्याज सवलत रकमेत मोठे गौडबंगाल; जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र, नगरमध्ये जिल्हा बँकेकडून ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात मोठा विलंब होत आहे. गेल्या तीन वर्षांच्या व्याजापोटी शासनाकडून मिळालेल्या तब्बल 63 कोटींचे काय झाले? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कार्ले यांच्यासह नगर तालुका महाआघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, मदडगावचे माजी सरपंच विलास शेडाळे, टाकळी काझीचे सरपंच अशोक ढगे, उपसरपंच अविनाश पवार आदी उपस्थित होते.

कार्ले म्हणाले, राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र, ते शेतकर्‍यांच्या खात्यावर कधी आणि किती वर्ग होते, हे शेतकर्‍यांना माहित नाही. तसेच सोसायटीलाही समजत नाही. ही बाब काही शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही दि.19 मे 2023 रोजी जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन या संदर्भातील माहिती मागविली होती. त्यांच्याकडून दि.14 जून 2023 रोजी माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार गेल्या 3 वर्षांत तब्बल 63 कोटी रूपये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयाला जमा केले. मात्र, जमा रकमेची तारीख आणि शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या तारखेमध्ये मोठा विलंब दिसून येत आहे. खंडाळा व पिंपळगाव लांडगा या दोन गावांतील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शेतकर्‍यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले असता, व्याजाची रक्कम खात्यात जमा झालेल्या तारखेत आणि उपनिबंधक कार्यालयाच्या तारखेत मोठी तफावत दिसत आहे.

अध्यक्षांनी श्रेयाऐवजी प्रश्न सोडवावा

शासनाने शेतकर्‍यांसाठी 1 रूपयात पीकविम्याची घोषणा केल्यावर केवळ प्रसिद्धीसाठी पीकविम्याची रक्कम जिल्हा बँक भरेल, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केली. ही बाब हास्यास्पद आहे. त्याऐवजी त्यांनी व्याजाची 63 कोटी रक्कम शेतकर्‍यांना कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कार्ले यांनी केले.

चार्‍याचा, पाण्याचा प्रश्न सोडवा

बँकेचे अध्यक्ष कर्डिले हे आपण सत्तेत असल्याचे सांगत आहेत. नगर तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. जनावरांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कर्डिले यांनी हा प्रश्न सोडवावा, असे पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर म्हणाले

हेही वाचा

नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा, गंगाथरन डी. यांची बदली

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचा सत्कार

Back to top button