नगर : राहुरी तालुक्यात रस्त्यांना 25 कोटी : आ. प्राजक्त तनपुरे | पुढारी

नगर : राहुरी तालुक्यात रस्त्यांना 25 कोटी : आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी, नगर व पाथर्डी मतदार संघातील विविध रस्त्यांना 25 कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. रस्त्यांच्या कामासाठी आ. तनपुरे यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरूच आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. परिणामी शासनाकडून निधी मिळावा म्हणून आ. तनपुरे यांचा पाठपुराव्याचे फलद्रूप पाहता 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. यापैकी राहुरी तालुक्यात 5 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला.

यामध्ये देहरे फाटा- कोळेवाडी-वांबोरी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण 5 (किमी) निधी-2 कोटी रूपये, वांबोरी-कुक्कढवेढे-उंबरे रसता मजबुतीकरण व डांबरीकरण (7 किमी) निधी-2 कोटी रूपये, वांबोरी-पांढरी पूल रस्ता-कात्रड- मोरेचिंचोरे-घोडेगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण(3 किमी) निधी-1 कोटी 50 लाख रूपये ही कामे होणार आहेत.

यासह पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थान ते घाटशिरस रस्ता (5 किमी) निधी 2 कोटी रूपये, पांढरीपूल ते मिरी रस्ता (10 किमी) निधी-2 कोटी रूपये, भोसे-करंजी रस्ता (4किमी) निधी-2 कोटी रूपये, मोहोज बु-चिंचोडी रस्ता (6 किमी) निधी-1 कोटी 20 लक्ष रूपये, त्रिभुवनवाडी-कोडगाव-खांडगाव- लोहसर (10 किमी) निधी-2 कोटी रूपये असा निधी वितरीत झाला आहे.

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर-आगडगाव- कोल्हार कोल्हुबाई घत्तट रस्ता(6.5 किमी) निधी-7 कोटी, वडगाव गुप्ता-पिंपळगाव माळवी गवारे वस्ती-जेऊर रस्ता (6.5 किमी) निधी-3 कोटी 30 लक्ष) असा एकूण 25 कोटी रूपयांचा एकूण निधी मतदार संघासाठी मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत आ. तनपुरे यांनी सांगितले की, राहुरी मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था सोडविण्यासाठी शासनस्तरावर सतत पाठपुरावा सुरूच आहे. राहुरी मतदार संघ हे माझे कुटुंब असून, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर लढा देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच संबंधित रस्ता कामांना प्रारंभ होऊन समस्या सोडविल्या जाणार असल्याचे आ. तनपुरे यांनी यावेळी सांगितले. सतत रस्त्यांमुळे होणार्‍या गैरसोयींकडे लक्ष देत आ. तनपुरे यांनी समस्या सोडविण्याचा पाठपुरावा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button